रानभाज्यांची ओळख करून घ्या कुडाळात 30 जुलैला

रानभाज्यांची ओळख करून घ्या कुडाळात 30 जुलैला

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30 जुलैला कुडाळ हायस्कूल येथे हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देसाई यांनी पंचायत समिती सभापती दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप हळदवणेकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गट विकास अधिकारी मोहन भोई, प्रफुल्ल वालावलकर, दीपक नारकर, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे ऋषिकेश पवार, अमित तेंडोलकर आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग संपन्न आहे. प्रत्येक ऋतूत इथला निसर्ग आपल्याला भरभरून देत आहेच. पावसाळा येताच माळरानावर अनेकविध प्रकारच्या रानभाज्या मुबलक प्रमाणावर नैसर्गिकरीत्या रुजून येतात. कोणत्याही खत, कीटकनाशकांच्या वापराशिवाय या भाज्या रुजतात. या रानभाज्यांची ओळख आजची युवा पिढी विसरत चालली आहे. त्यांनाही या भाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ आणि कुडाळ हायस्कूल यांच्यावतीने 30 ला दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हास्तरीय रानभाज्या प्रदर्शन पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

श्री. देसाई म्हणाले, ""निसर्गातील रानभाज्या त्यांच्या उच्च पोषणमूल्य औषधी मूल्यामुळे आपल्या सध्याच्या वापरातील भाज्यापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात; पण वाढत्या शहरीकरणात यातील अनेक भाज्या आपल्या आहारातून कमी झाल्यात. विस्मृतीत गेल्या आहेत. आपल्या दैनंदिन आहाराचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी या रानभाज्यांचा वापर वाढवणे आणि शहरी लोकांना या रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने रानमाया महोत्सव अंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

श्री. देसाई म्हणाले, स्पर्धकांनी रानभाज्यांची पाककृती करून शिजवून आणावी. सोबत कागदावर पाककृती पाककृतीचे नाव, साहित्य, विस्तृत पाककृती, वैशिष्ट्ये, महत्त्व, सुवाच्य अक्षरात लिहून आणावे; परंतु त्यावर आपले नाव लिहू नये. पाककृतीसाठी वापरलेल्या भाजीचा नमुना सोबत आणणे आवश्‍यक आहे. विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय परीक्षकांच्या प्रेक्षकांच्या पसंतीने काही विशेष बक्षिसेसुद्धा जाहीर केली जाणार आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.''

गावठी बाजारात उपलब्ध
जिल्ह्यात गावठी बाजार ही संकल्पना चांगली रुजत आहे. या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता या बाजारात रानभाजा असणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com