लांजा नगरपंचायतीत होणार का सेना - भाजप युती ?

Will Shiv Sena  - BJP Alliance In Lanja Nagarpanchayat
Will Shiv Sena - BJP Alliance In Lanja Nagarpanchayat

लांजा ( रत्नागिरी ) - लांजा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येवून ठेपलेली असताना महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या मुद्दयावरून शिवसेना - भाजप युतीमध्ये कलगीतुरा रंगून सेना युतीतून बाहेर पडली आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्‍यता आहे. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होणार की पुन्हा एकदा भाजप शिवसेनेला नगराध्यक्षपदासह सत्तेपासून दूर ठेवणार की शिवसेना भाजपला धोबीपछाड देणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. 

विधानसभा निवडणुका युतीच्या माध्यमातून लढविल्या गेल्या. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकही युतीमार्फतच लढवली जाईल, असे वाटत होते. मात्र सध्या राज्यात सरकार स्थापनेवरून दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद झाले आहेत. त्याचे पडसाद फेब्रुवारीत होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत युती असताना भाजपाने शिवसेनेला सुरवातीच्या काळात सत्तेपासून दूर ठेवले होते.

शिवसेनेचे संख्याबळ सहावर

मागील निवडणुकीत नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी शिवसेनेने 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 4, भाजपाने 2 तर अपक्षांनी सर्वाधिक सहा जागा जिंकल्या होत्या. स्पष्ट बहुमतासाठी लागणाऱ्या संख्याबळाचा आकडा एकाही राजकीय पक्षांना गाठता आला नव्हता. सत्ता स्थापनेसाठी किमान 9 सदस्यांची गरज होती. शिवसेनेने अपूर्वा मुळे या अपक्ष नगरसेविकेला सेनेच्या गोटात सामील करून घेतल्याने शिवसेनेचे संख्याबळ सहा झाले होते. सोबत मित्रपक्ष भाजप आल्यास ही संख्या आठ होऊन व आणखी एका अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करणाचा मनसुबा शिवसेनेचा होता. मात्र ऐनवेळी भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावत राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या लांजा शहर विकास आघाडीमध्ये सहभागी होत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. याची सल शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये होती. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या घडामोडीमध्ये शिवसेनेने नगरपंचायतीवर कब्जा मिळवत पुन्हा सत्ता हस्तगत केली. 

एकत्र येण्याची शक्यता धुसर

आता पुन्हा या दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढणार ही शक्‍यता सध्यातरी धुसर आहे. त्यातच मागील निवडणुकीत भाजपने केलेल्या दगाफटक्‍याचे शिवसेना उट्टे काढणार की पुन्हा एकदा भाजप शहरविकास आघाडीला मदत करणार याबाबत उत्सुकता आहे. 

एकत्र येणे अशक्य
""लांजा नगरपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र येणे शक्‍य नाही. मागील निवडणूक सुद्धा दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते.'' 
- रुपेश गांगण,
स्वीकृत नगरसेवक, लांजा   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com