वार्‍याने अडवली मच्छीमारांची वाट

राजेश कळंबटे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस मच्छीमारांना कोळंबी, लेप, पापलेटस काही ठिकाणी बांगडा मिळत होता; मात्र शनिवारपासून (ता. 4) पुन्हा वार्‍याने जोर धरल्यामुळे समुद्रात गेलेल्या मिरकरवाडा बंदरातील अनेक बोटी माघारी परतल्या.

रत्नागिरी - हंगाम सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस मच्छीमारांना कोळंबी, लेप, पापलेटस काही ठिकाणी बांगडा मिळत होता; मात्र शनिवारपासून (ता. 4) पुन्हा वार्‍याने जोर धरल्यामुळे समुद्रात गेलेल्या मिरकरवाडा बंदरातील अनेक बोटी माघारी परतल्या.

जुन जुलै महिन्यांच्या बंदीनंतर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना कोळंबीचे विविध प्रकार सापडत होते. सुरवात चांगली होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिरकरवाडा, हर्णै या मोठ्या बंदरावर मत्स लिलावाची प्रक्रियाही सुरु झाली. मासे कमी मिळत असल्यामुळे व्यावसायीकांकडून दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. मासळी आली की असेल त्या दरात विकत घेतले जात आहेत. त्यातील दर्जेदार माल निर्यातीसाठी वापरण्यात येत आहे. पुर्णगड ते जयगड या पट्ट्यात मच्छीमारांना कोळंबी मिळत आहे. तर बुरोंडीसह दापोली भागात मच्छीमारांना काही प्रमाणात पापलेट मिळत आहे. त्यामुळे मच्छीमार समाधानी आहेत.

कालपासून वातावरण बिघडले आहे. वारा आणि पावसामुळे पाण्याला करंट आहे. समुद्रात बोटी उभ्या राहत नसल्याने मासेमारी करताना अडथळे येत आहे. वातावरण केव्हाही बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमार सकाळी जाऊन संध्याकाळी बंदराकडे परतात. वादळ झाल्यास सुरक्षित ठिकाणी पोचता यावे यासाठी ही काळजी मच्छीमार घेत आहेत. हवामान विभागाकडूनही वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे वातावरण अजून दोन दिवस राहील असा अंदाज आहे. 

वातावरण बदलले कि मच्छीमार जास्त काळ समुद्रात थांबत नाहीत. वारे वाहू लागल्यानंतर मासे खोल पाण्यात जातात.

- पुष्कर भुते, मच्छीमार

इन्क्वॉईसचा आधार

इन्क्वॉईस यंत्रणेद्वारे प्रसारीत करण्यात येणार्‍या माहितीचा आधार घेऊन मच्छीमारांना समुद्रातील मत्स्य साठ्याचे ठिकाण मिळू शकते. इन्क्वॉईसच्या सूचनेत वार्‍याचा वेग, लाटांची ऊंची आणि पाण्याचा प्रवाह याचीही माहिती देण्यात येते. मासे प्रवाहाच्या दिशेने पुढे जातात. प्रवाह समजले की तेथे मासेमारी करता येते.

Web Title: wind block fishing in Ratnagiri