esakal | काजू बागायतदारांना फसविणाऱ्या महिलेस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

०

दोडामार्ग तालुक्‍यातील काजू सेंद्रिय आहेत. त्यामुळे राज्यात ते नंबर वन मानले जातात.

काजू बागायतदारांना फसविणाऱ्या महिलेस अटक

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग  (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील अनेक काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष दाखवून नंतर पैसे देण्याचे आश्‍वासन देऊन पसार झालेल्या त्या महिलेला अखेर पुण्यात अटक करून येथे आणण्यात आले. जवळपास दीड वर्ष ती महिला पोलिसांना गुंगारा देत होती. येथील पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांनी पुण्यात तिच्या मुसक्‍या आवळल्या. दिव्या ओबेराय ऊर्फ शिल्पा राजेश खांडोळकर (वय 45,रा. झरेबांबर, सध्या पुणे) असे तिचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य संशयित मल्लिकार्जुन गावडेने यापुर्वी अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्या दोघांनी मिळून वीस शेतकऱ्यांना 23 लाख रुपयांना गंडा घातला होता. 

पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी याबाबत दिलेली माहिती अशी ः दोडामार्ग तालुक्‍यातील काजू सेंद्रिय आहेत. त्यामुळे राज्यात ते नंबर वन मानले जातात. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यापेक्षा इथल्या काजूला अधिक भाव मिळतो. दिव्या ऊर्फ शिल्पा हिने काजू हंगामात झरेबांबर येथे भाडेतत्वावर खोली घेवून बस्तान बसवले. सुरवातीला अधिक भावाने काजू खरेदी करुन पैसेही दिले. तालुक्‍यात असे अनेक व्यापारी, कारखानदार आहेत जे वर्षानुवर्षे इथल्या शेतकऱ्यांकडून काजू खरेदी करतात. काहीजण हंगामात मोठ्या प्रमाणावर काजू खरेदी करुन हंगाम संपल्यावर त्या हंगामातील सर्वाधिक दराने पैसे देतात; पण संबंधित महिलेने शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करुन आणि अधिक दर देवून काजू खरेदी केला. त्यानंतर सुमारे 23 लाख 21 हजार 768 रुपयांचे काजू अनेक शेतकऱ्यांकडून खरेदी केले आणि रातोरात खोली सोडून पळ काढला. त्यामुळे खळबळ उडाली. फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. दोघांविरुध्द तक्रारी दाखल झाल्या. यातील मल्लिकार्जुन गावडे याने अटकपूर्व जामिन मिळवला. दिव्या ऊर्फ शिल्पा पसार झाली. अखेर दीड वर्षांनी तिचा ठावठिकाणा मिळवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले. श्री. थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बागल यांच्या पथकाने काल (ता.21) तिला पुणे येथे अटक करून आज येथे आणले. 

संपर्काचे आवाहन 
शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या दिव्या ऊर्फ शिल्पाला उद्या (ता. 23) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्या 20 शेतकऱ्यांशिवाय अन्य कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन श्री. थोपटे यांनी केले आहे.  

संपादन : विजय वेदपाठक