बांद्याजवळ महिलेस मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

बांदा -पतीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीसह जमावाने एका महिलेला घरात घुसून बेदम मारहाण केली. संबंधित महिलेच्या घरातील टीव्ही, फ्रीजसह अन्य मौल्यवान वस्तूचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरातील लहान मुलगी आणि बांधून असलेल्या कुत्र्यालाही या संतप्त जमावाने सोडले नाही. स्थानिकांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार काल मध्यरात्री घडला.

शिरोडा मार्गावर बांद्यापासून काही अंतरावर असलेल्या गावात हा प्रकार घडला. त्या गावात परजिल्ह्यातील महिला एका अल्पवयीन मुलीसह राहते. त्यांचा बंगला वस्तीपासून सुमारे तीनशे मीटरवर आहे. पतीचे तेथील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा अन्य एका गावातील महिलेला संशय होता. काल (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारास आपला पती त्या महिलेच्या घरात असल्याची माहिती मिळताच काही महिला व अन्य युवकांना सोबत घेऊन पत्नीने त्या महिलेचे घर गाठले. तेथे तिचा पती होता. यामुळे संतप्त जमावाने त्या महिलेला बेदम मारहाण केली. अंगणातील कुत्रा व अल्पवयीन मुलीलाही जमावाने झोडपले. 

दरम्यानच्या काळात त्या महिलेने आपली कशीबशी सुटका करून घेत स्वयंपाकघर गाठले. गावातील काही ग्रामस्थांना मोबाईलवरून घटनेची माहिती देत आपल्याला वाचविण्याची याचना केली. प्रसंगावधान दाखवत १० ते १५ ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. संतप्त जमावाला त्यांनी रोखले. येथील पोलिसांनाही याची माहिती दिली.

जमावाने घरातील टीव्ही, फ्रिजसह अन्य मौल्यवान वस्तूंची नासधूस केली. गावातील ग्रामस्थांकडेही जमावाने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेताच तणाव निवळला. त्या पत्नीच्या पतीने नरमाईची भूमिका घेत झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली.

दरम्यानच्या काळात बांदा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी या प्रकरणाबाबत तडजोड झाली. येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

प्रकरणावर पडदा
दोन्ही बाजूंनी तडजोड करीत आज या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मारहाण झालेल्या महिलेने कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: woman was beaten near Banda