काथ्या उद्योग महिलांनी अंगीकारावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मालवण - जिल्ह्यात सुमारे 40 हजार हेक्‍टर क्षेत्रात नारळाच्या झाडांची लागवड आहे. नारळाचे झाड हे बहुपयोगी असल्याने त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते. या नारळाची सोडणे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आज महिलांना विविध विवंचना भासत असून, ही विवंचना दूर करण्याची ताकद काथ्या उद्योगात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराची संधी असल्याने काथ्या उद्योगाचा महिलांनी अंगीकार करावा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज तळगाव येथे केले. 

मालवण - जिल्ह्यात सुमारे 40 हजार हेक्‍टर क्षेत्रात नारळाच्या झाडांची लागवड आहे. नारळाचे झाड हे बहुपयोगी असल्याने त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते. या नारळाची सोडणे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आज महिलांना विविध विवंचना भासत असून, ही विवंचना दूर करण्याची ताकद काथ्या उद्योगात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराची संधी असल्याने काथ्या उद्योगाचा महिलांनी अंगीकार करावा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज तळगाव येथे केले. 

महाराष्ट्र काथ्या उत्पादन, प्रशिक्षण व प्रदर्शन पथदर्शी प्रकल्पांतर्गत तळगाव येथे सुरू केलेल्या सामूहिक सुविधा केंद्राचे उद्‌घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, कॉयर बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र कॉयर बोर्डचे अध्यक्ष शिवाजी दौड, माजी आमदार प्रमोद जठार, तळगाव सरपंच शारदा पेडणेकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी महापौर दत्ता दळवी, संजय पडते, जान्हवी सावंत, अभय शिरसाट, देवयानी मसुरकर, शैलेश भोगले, श्‍वेता सावंत, हरी खोबरेकर यांच्यासह तालुक्‍यातील महिला उपस्थित होत्या. 

श्री. देसाई म्हणाले, ""जिल्ह्यातील परिस्थिती पाहता माडबागायती मोठ्या प्रमाणात आहे. नारळाची सोडणे येथे टाकून दिली जातात किंवा जाळली जातात. प्रत्यक्षात नारळाची सोडणे ही इंधन नसून ती राष्ट्रीय संपत्ती आहे. केरळ राज्यात काथ्या उद्योगातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. त्यामुळे या काथ्या उद्योगात महिलांनी आपला सहभाग देत आर्थिक उन्नती साधायला हवी या दृष्टिकोनातूनच जिल्ह्यात राष्ट्रीय कॉयर बोर्ड व राज्य शासन यांच्या वतीने चौदा ठिकाणी सामूहिक सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांनी काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण घेत रोजगार उपलब्ध करून घ्यावा.'' 

श्री. केसरकर म्हणाले, ""केरळची अर्थव्यवस्था काथ्या उद्योगावर आहे. जिल्ह्यात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सामूहिक सुविधा केंद्रांच्या माध्यमातून महिलांना काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. येत्या चार वर्षात जिल्ह्यात 48 केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 4800 महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून आवश्‍यक ते प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे महिलांनी आणि युवकांनी आपली प्रगती साधण्यासाठी मेहनत घ्यायला हवी.'' 

कॉयर बोर्डचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन म्हणाले, ""जिल्ह्यात माड बागायती मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी काथ्या उद्योगातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात या उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्‍यक असलेली सर्वतोपरी मदत राष्ट्रीय कॉयर बोर्डाच्या माध्यमातून दिली जाईल.'' या वेळी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनीही आपले विचार मांडले. 

येत्या काळात काथ्या उद्योगाबरोबरच मध, बांबूपासून फर्निचरनिर्मिती या व्यवसायांवर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील गावागावांत काथ्या उद्योगाबाबत जनजागृती झाल्यास या उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती साधता येईल. या सुविधा केंद्राच्या माध्यमातून चांगली सुरवात करण्यात आली असून, येणाऱ्या परिस्थितीवर मात करत या उद्योगातून प्रगती साधूया. 
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री 

Web Title: Women coir industry