हातावर पोट असलेल्यांचा जीव धोक्यात

सुनील पाटकर
शुक्रवार, 25 मे 2018

महाड : गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स कंपनीच्या जिओचे केबल टाकण्याचे काम सुरु असुन अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यांची वाट लावली आहे. अशा प्रकारेच बाणकोट खाडी (सावित्री नदी) वरील आंबेत पुलावर केबल टाकताना कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने हातावर पोट असलेले कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहेत.या कामांमुळे कामगार व पूलालाही धोका निर्माण झाला आहे.

सर्व नियम धाब्यावर बसवून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जीओचे काम केले जात आहे. खोदाई करतांना रस्तायपासुन अंतर न सोडल्याने रस्त्याच्या साईडपट्टीची पूरती वाट लागलेली आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग हातावर हात ठेवून गप्प बसून आहे. सध्या सावित्री नदी ( बाणकोट खाडी) वर असलेल्या आंबेत येथील मोठ्या पूलावरुन केबल टाकण्याचे काम सुरु असुन येथील कामगार जीवावर उदार होऊन काम करत आहेत. खाडीचे पात्र भव्य पात्र असुन सुमारे चौदा मीटर उंचीच्या या पुलावरील कठड्याच्या शोभेच्या लोखंडी रेलींगला दोरीचा झुला बांधून त्यावर बसून कामगार काम करत आहेत. काम करतांना कामगार पडल्यास त्याची वाचण्याची शक्यता तिळमात्र नाही हे माहित असुनही या कामगारांना कोणतेच सुरक्षिततेचे साधन न देता एक नामांकित कंपनी केबलचे काम कसे करत आहे याबाबत स्थानिक नागरिकांत देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.

येथील नागरिकांनी या कामाबाबत माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील कळवले मात्र कोणीही अधिकारी याकडे फिरकले नाही असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शिवाय या पुलाच्या कठड्याला पाईप अडवण्यासाठी ड्रिलिंग देखील केले जात असल्याने पुलाला देखील धोका निर्माण झाला आहे. गत वर्षीच या पुलाच्या कठड्यांचे काम केले होते. आता ड्रील मारून या नव्याने करण्यात आलेल्या कठड्याचेही वाटोळे लावले जात असुनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळ्यावर पट्टी ठेवून आहे.महाड तालुक्यातही जिओची केबल टाकण्याचे काम सुरु आहे. या बाबत सकाळने वृत्त प्रसिध्द केल्यावर  सार्वजनिक बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे परंतु कंपनीचा दबदबा आणि त्यातच ते काम वरिष्ठ पातळीवरून मंजूर झाल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आडकाठी आणू नये अशी ताकिद दिल्याने कारवाई करण्या बाबत बांधकाम विभाग हात आखडते घेत आहे.हा पूल खाडीवरील पूल व रायगड - रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा पूल असल्याची त्याची खबरदारी अधिक घेतली जावी अशी नागरिकांची मागणी आहे. 

Web Title: this work is very dangerous for the workers