#TuesdayMotivation प्रेरणादायी! आहे मी असा तरीही...

सचिन माळी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.

मंडणगड ( रत्नागिरी ) - आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, दोन्ही पायांनी अपंग असूनही खचून, अगतिक न होता, जीवनात आनंद फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील विन्हे गावच्या रुपेश वामन पवार यांनी करून दाखविला आहे. शेती, अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली. 

मंडणगडपासून 18 कि.मी. अंतरावर विन्हे गावी रुपेश पवार यांनी आपली कार्यसृष्टी निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ येथील अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच, आईवडील शेती तर भाऊ हाॅटेलमध्ये काम करायचा. त्यामुळे घराचे जेमतेम उत्पन्न. त्यात अपंगत्व, त्यामुळे डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. त्या परिस्थितीत रुपेशने शेती करण्याचा निर्धार केला. आईवडिलांसोबत शेतात राबू लागला.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 
 

कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेती विकास

वर्षाअखेर फक्त खाण्याइतपच धान्य घरात येत होते. खर्च व श्रम भरपूर पण उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीचे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठले. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके, ऍग्रोवन वाचून शेतीचा अभ्यास केला. कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतले. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बीट, मुळा, पालक, मेथी, मटार याचेही उत्पादन घेतले. स्वतः कुंबळे व लाटवण बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. रुपेश यांनी धडधाकट शेतकऱ्यापेक्षा सरस कर्तृत्व सिद्ध केले. 

हेही वाचा - कोणी केली मालवण नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ?

स्पर्धा, पुरस्कारांवर छाप 

रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाचा 2017 साली सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Disability Day Handicap Rupesh Pawar Success In Farming