#WorldPopulationDay रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकसंख्येत 80 हजारांनी घट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

रत्नागिरी - देशातील लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या घटत आहे. 70 ते 80 हजारांनी लोकसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील तरुण मुलांचे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर हा एक भाग यासाठी परिणामकारक असून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी दिली. 

रत्नागिरी - देशातील लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या घटत आहे. 70 ते 80 हजारांनी लोकसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील तरुण मुलांचे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर हा एक भाग यासाठी परिणामकारक असून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी दिली. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. एम. आर. कोरे, रेळेकर उपस्थित होते. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून 11 जुलै हा दिवस मानला जातो. लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक असून चीन पहिल्या क्रमांकावर आहे. काही देशांच्या लोकसंख्या वाढीचा दर 1 टक्केपेक्षाही खाली आला आहे. आपला हाच दर 1.7 टक्के इतका आहे. देशाची लोकसंख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्हा मात्र याला अपवाद आहे. 2001 ते 2011 या दोन जनगणनेमधली आकडेवारी पाहिल्यावर हे लक्षात येते.

जवळपास एक्‍याऐंशी हजाराने जिल्हयाच्या लोकसंख्येत घट झाली. जिल्हयात वाढलेले साक्षरतेचे प्रमाण तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी वैद्यकीय क्षेत्रात झालेले बदल लोकांची बदलत चाललेली मानसिकता, याचा हा परिणाम आहे असे वाटते. एक व दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रत्नागिरी जिल्हयाचा जन्मदरही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या मानाने खूपच कमी होत आहे. महाराष्ट्राचा जन्मदर पंधरा ते सोळा दरम्यान असताना रत्नागिरी जिल्हयाचा जन्मदर 11.7 टक्‍के आहे. मृत्यू दर 7.90 टक्‍के तर माता मृत्यू दर 0.29 आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण 7.40 तर बालमृत्यूचे प्रमाण 0.10 टक्‍के आहे. 

कुटुंब नियोजनचेही प्रमाण चांगले 
रत्नागिरी जिल्हयाच्या लोकसंख्या नियंत्रणात स्थलांतर ही बाब प्रामुख्याने परिणामकारक ठरत असून ग्रामीण भागातील लोकांचे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचेही प्रमाण चांगले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात 2,473 लोकांनी एक व दोन मुलांनंतर शस्त्रक्रिया करुन घेतले आहे. 

भाग्यश्री योजनेंतर्गत सन्मान 
लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे शामरावे पेजे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये एक आणि दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत रोख रक्‍कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात एक मुलींसाठी 32, तर दोघींसाठी 133 जणांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, आरोग्य सभापती विनोद झगडे यांच्यासह सर्व सभापती, सदस्य उपस्थित राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Population Day special story Ratnagiri District