उद्योगपतींना कर्जमाफी हे कुठले जनहिताचे धोरण? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

कणकवली : गोरगरिबांच्या कल्याणासाठी नोटा बदलण्याचे धोरण राबवीत असल्याचे केंद्र शासन सांगत आहे. याच दरम्यान बड्या उद्योगपतींची कोट्यवधीची कर्जे माफ केली जात आहेत. हे कुठले जनहिताचे धोरण, असा प्रश्‍न आज संवाद यात्रेतील लेखक-कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

कणकवली : गोरगरिबांच्या कल्याणासाठी नोटा बदलण्याचे धोरण राबवीत असल्याचे केंद्र शासन सांगत आहे. याच दरम्यान बड्या उद्योगपतींची कोट्यवधीची कर्जे माफ केली जात आहेत. हे कुठले जनहिताचे धोरण, असा प्रश्‍न आज संवाद यात्रेतील लेखक-कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी देशातील असहिष्णू वातावरणाविरोधात देशात दक्षिणायन यात्रा सुरू केली आहे. या औचित्यावर मडगाव-गोवा येथे 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बहुभाषिक राष्ट्रीय दक्षिणायन संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातील विचारवंत, लेखक-कवी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाची संवाद यात्रा मुंबई ते गोवा अशी सुरू आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या लेखक, कार्यकर्त्यांनी आज गोपुरी आश्रम येथे सिंधुदुर्गातील मान्यवरांशी संवाद साधला. 

संवादयात्रेतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, पत्रकार युवराज मोहिते, युथ मोटिव्हेटर आशुतोष शिर्के, समीक्षक मंदार काळे, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर आदींनी देशभरात सुरू असलेल्या स्थित्यंतराबाबत चर्चा केली. वाढती असहिष्णुता, नोटा बंदी, कर्जमाफी याबाबतची केंद्राची धोरणे या विषयांवरही मुक्‍त चर्चा झाली. 

श्री. मोहिते म्हणाले, 'आज जे लोकशाहीविरोधी वातावरण देशात आहे त्याविरुद्‌ध लोकांना बोलावेसे वाटत आहे. त्यासाठी आपण समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विशिष्ट विचार लादला जाण्याच्या प्रकारातून माणसाच्या मूलभूत हक्‍कावरच गदा येत आहे. काय बोलावे, काय खावे यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एका बाजूला विकासाचे चित्र उभे केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला माणसाच्या स्वातंत्र्याचीच मुस्कटदाबी केली जात आहे. 

ते म्हणाले, ''सद्य:स्थितीत वेगळा विचार करणाऱ्याला, मांडणाऱ्याला गुन्हेगार ठरवले जातेय. यातून डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सगळ्या मागे काय राजकारण आहे हे आता विचार करणाऱ्या वर्गाने समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सतत प्रश्‍न विचारत राहिले पाहिजे.'' 

या वेळी आशुतोष शिर्के, मंदार काळे, राजन इंदुलकर आदींनीही विचार व्यक्‍त केले. या वेळी झालेल्या चर्चेत इंद्रजित खांबे, डॉ. शमिता बिरमोळे, अर्पिता मुंबरकर, शशिकांत कांबळी, विनायक सापळे, अभय खडपकर आदींनी भाग घेतला. 

आपण सतत प्रश्‍न उपस्थित करत रहायला हवेत. प्रश्‍न उपस्थित केले नाहीत, तर सनातन विचाराच्या लोकांना ते फायद्याचेच ठरत असते. सनातन्यांचा आवाज मोठा असला तरी ते वर्चस्व निर्माण करताहेत, असे कोणी समजण्याचे कारण नाही. कारण आवाज मोठा असला तरी विचार दाबता येत नाहीत. 
- डॉ. आशिष देशपांडे, मानसोपचार तज्ज्ञ 

Web Title: Writers, activists questions PM Modi's decision to demonetization