Wrong Person Arrested In Motor Cycle Theft Case
Wrong Person Arrested In Motor Cycle Theft Case

धक्कादायक ! चोर सोडून संन्याशाला बेड्या 

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - मोटारसायकल चोरी प्रकरणात खऱ्या संशयिताला न पकडता कणकवली पोलिसांनी "चोराला सोडून संन्याशाला बेड्या ठोकल्याचा' धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अटक केलेल्या संशयित तरूणाने पोलिसांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऍड. उमेश सावंत यांनी सांगितले. 

कणकवलीतून मोटरसायकल चोरीचा प्रकार 16 नोव्हेंबरला घडला होता. "ओएलएक्‍स'वरील जाहिरात वाचून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या संशयिताने "दुचाकीची ट्रायल घेतो व येताना बॅंकेतून रक्‍कमही काढून आणतो' असे सांगत कणकवली बाजारपेठेतील दुचाकी (एमएच-07/एएल-5828) चोरली होती. याबाबतची तक्रार संबंधित दुचाकी मालकाचे नातेवाईक दिलीप दिनकर करंजेकर (वय 38, रा. करंजे) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली होती. गाडीखरेदीबाबत अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून चौकशी केली होती. त्या संशयितांना करंजेकर यांना फसवत गाडी खरेदीची रक्कम न देताच दुचाकी घेवून कणकवलीतून पळ काढला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी सावंतवाडी येथे एका युवकाला 7 डिसेंबरला ताब्यात घेतले होते. पुढील तपासासाठी येथील पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके व सहकाऱ्यांनी 7 डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास सावंतवाडी येथील तलावाजवळ फिर्यादीने संशयिताला ओळखल्याचा दावा करत संशयिताला ताब्यात घेतले होते. 

दहा हजाराच्या रोख रकमेच्या जाचमुचलक्‍यावर मुक्‍तता

याप्रकरणी तपासी पोलिस के. एस. साळसकर यांनी संशयिताला न्यायालयात हजर करत तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली; मात्र संशयितातर्फे करण्यात आलेल्या युक्‍तीवादात घटनेवेळी संशयित हा वास्को - गोवा येथील "कोरल केमिकल सिस्टम' येथे नोकरीस असल्याचे हजेरीपत्रक, सीसीटीव्ही फुटेज तसेच ज्या मोबाईलवरून फिर्यादीस गाडीबाबत विचारणा झाली तो मोबाईल रत्नागिरी येथील लोकेशन दाखवत असल्याचा युक्‍तिवाद करण्यात आला. त्यामुळे संशयिताचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत दहा हजाराच्या रोख रकमेच्या जाचमुचलक्‍यावर संशयिताची मुक्‍तता केली. 

प्रकरण शेकण्याची शक्‍यता 

हे प्रकरण आता पोलिसांना शेकण्याची शक्‍यता आहे. याबाबत संबंधित तरूणाचे वकील ऍड. सावंत यांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता ही कारवाई केल्याने त्या तरूणाची बदनामी झाली आहे. यामुळे हा दावा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com