esakal | यावर्षी चिपळूणात दिसणार नाही दहीहंडीचा थर
sakal

बोलून बातमी शोधा

this year celebration of janmashtami with government rules in chiplun

सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करत जन्माष्टमीची पूजा

यावर्षी चिपळूणात दिसणार नाही दहीहंडीचा थर

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक राज्याची पर्यायाने देशाची सुरक्षाव्यवस्था ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणे यामधील रेषा फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर हा एकमेव पर्याय असल्यामुळे यावर्षीचा श्रीकृष्णजन्म (अष्टमी) उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता उद्या दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाचे थरही पहायला मिळणार नाहीत. 

हेही वाचा - सिंधुदुर्गात गणेशोत्सव  साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर : के मंजुलक्ष्मी..

दहीहंडी उत्सवाच्या 2 महिनेआधीच थरांच्या सरावाला सुरूवात होते. 'बोल बजरंग बली की जय' अशा आरोळ्या देत थर रचले जातात. दहिहंडीच्या दिवशी आयोजकांनी लावलेली मोठ्या किमतीचे बक्षिस जिंकण्यासाठी गोविंदा पथकांची धडपड असते. चिपळूणातील कोळकेवाडी, पठारवाडी, पोफळी, खेर्डी आणि दसपटीतील गोविंदापथक मोठ्या रक्कमेचे बक्षिस मिळवण्यासाठी दोन दिवस आधीच पुणे, ठाणे आणि मुंबईत रवाना होतात. स्थानिक गोविंद पथक जिल्हयाच्या दहिहंडी उत्सवात रंगत चढवतात. 

दरवर्षी त्यासाठी जिल्हाभरातील दहीकाला उत्सव मंडळे या उत्सवाच्या नियोजनात गुंतून जातात. दहीहंडीची तयारी म्हणून मानवी मनोरे रचण्याच्या सरावाला काही दिवस अगोदर सुरूवात करत असतात. गोपाळकाल्याच्या दिवशी गल्लीबोळातील गोविंदा पथकं वाजतगाजत, दहीहंड्या फोडतात. शिरगाव बाजारपेठ मंडळाची दहीहंडी डोळ्यावर पट्टी बांधून फोडली जाते. चिपळूणमध्ये विविधी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या हंड्या लावल्या जातात.

हेही वाचा - रत्नागिरीत मुर्तीकलेचा वारसा नसणारा कुंभार...

महिलांची दहिहंडी हा देखील येथील आकर्षणाचा भाग असतो. पण कोरोनामुळे हा उत्सव बंधनात आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये अडकला आहे. दहीहंडी उत्सवासाठी प्रत्यक्ष सहभागी होणारे आणि तो बघणारे अशी प्रचंड गर्दी होते. आता गर्दी होणे योग्य नाही. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा होण्यावरच मर्यादा पडली आहे. पथकांनी स्थानिक पातळीवर सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करत जन्माष्टमीची पूजा करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. 

गतवर्षी जिल्ह्यात 351 सार्वजनिक व 3 हजार 239 खासगी स्वरूपात दहिहंड्या फुटल्या होत्या. पण यावर्षी गोविंदा पथकांवर आणि दहिहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे याववर्षी दहिहंडी फोडण्यासाठी रचले जाणारे थरांचे मनोरे लागणार नाहीत. 

हेही वाचा - आता फक्त चिंगळांचाच आधार..

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिपळूणातील कोहिनूर मित्रमंडळातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेला 68 वर्षाची परंपरा आहे. कोरोनामुळे ही स्पर्धाही यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संचालक नयन साडविलकर यांनी दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top