पर्यटकांनो सावधान! समुद्रात पोहायला जात असाल तर थोडं जपुन

yesterday tourist drawn in dabhol sea reaction for tourist in ratnagiri
yesterday tourist drawn in dabhol sea reaction for tourist in ratnagiri

दाभोळ (रत्नागिरी) : आंजर्लेतील समुद्रात पर्यटक ज्या ठिकाणी बुडाले तेथे मोठा खड्डा तयार झाला आहे. पर्यटकांना पोहायला गेल्यावर तेथील खोलीचा अंदाज येत नाही. अशा स्थितीत पोहण्याचा त्यांना सरावही नसतो. यातच पाण्याला करंट असेल तर पर्यटक तेथे बुडायचाच. तेथील स्थानिक लोक कोणाला पोहायला जायला देत नाहीत, मात्र हे पर्यटक तेथेच गेले आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली, अशी प्रतिक्रिया बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनय केळस्कर यांनी दिली. 

सहा जणांना समुद्राबाहेर काढण्याची मोहीम आंजर्ले-भंडारवाडा येथील युवकांनी राबवली. बचावकार्यात सहभागी झालेले अभिनय केळस्कर यांनी सांगितले की, ‘समुद्रात पोहण्यासाठी गेलेले पर्यटक बुडत असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही बचाव साहित्यासह समुद्रकिनारी धाव घेतली. माझा भाऊ व काही मित्रांनी आंजर्ले खाडीत असलेली स्पीड बोट घेतली. ते बचावकार्यासाठी समुद्रात घुसले. मी रिंग बोया घेऊन पाण्यात गेलो; मात्र समुद्राच्या पाण्याला मोठा करंट होता.

बुडणाऱ्या दोघांना मी व मित्रांनी रिंग बोयाच्या साह्याने जिवंत किनाऱ्यावर आणले. भावाने समुद्रात शोध घेऊन एकाला जिवंत व तिघांचे मृतदेह स्पीड बोटीने किनाऱ्यावर आणले. समुद्राच्या पाण्याला करंट इतका होता की, आम्ही जिवंत किनाऱ्यावर परत येऊ की नाही, याची शाश्‍वती नव्हती.’ पुणे येथील पर्यटक पोहायला गेले होते. तेथे एक खड्डा तयार झाला आहे. त्या जागी पोहायला गेलेल्या पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. 

पाण्याला करंट असेल तर ते बुडतात, असा आमचा अनुभव आहे. आम्ही या भागात कोणाला पोहायला जाऊ देत नाही; मात्र हे सहाजण आमची नजर चुकवून पोहायला गेले होते, असे त्यांनी सांगितले. 

या आधी दोन वेळा पर्यटक वाचले

आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी पोहायला गेलेल्या ५ महिला पर्यटकांना बुडताना आम्ही वाचवले होते. महिन्यापूर्वी दोन पर्यटकांनाही वाचवले होते. स्थानिक लोकांना समुद्राची माहिती असते. नेमका धोका माहिती असतो, मात्र पर्यटकांचा उत्साह त्यांच्या जिवावर बेततो. स्थानिक ज्या धोक्‍याच्या सूचना देतात त्या पर्यटकांनी गांभीर्याने पाळल्या पाहिजेत, असे अभिनय केळस्कर यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com