कल्याणच्या तरुणाचा मालगुंड किनारी बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

ही घटना शनिवारी (ता. 21) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

रत्नागिरी - दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी आलेल्या ठाणे-कल्याण येथील तिघा मित्रांपैकी एका तरुणाचा मालगुंड समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. उर्वरित दोघेजणं सुरक्षित आहेत.

ही घटना शनिवारी (ता. 21) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव तुषार शरद दळवी (वय 34, रा. कल्याण-ठाणे) आहे. जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखर आप्पा राजे (वय 34), अमितेश त्रिपाठी (वय 32) आणि तुषार दळवी (तिघेही रा. कल्याण जि. ठाणे) हे तिघे मित्र शनिवारी सकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. दिवसभर गणपतीपुळे येथील एका लॉजला ते वास्तव्यास होते. गणपतीपुळे परिसर फिरल्यानंतर दर्शन घेऊन तिघेही शांत अशा मालगुंड-गायवाडी येथील समुद्रकिनारी आले. गणपतीपुळे किनाऱ्यावर गर्दी असल्यामुळे ते मालगुंड किनारी आले होते. ते तिघेही शांत समुद्रात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही खोल समुद्रात ओढले जाऊ लागले. शेखर आणि अमितेश हे दोघे जिवाची बाजी लावून पाण्यातून सुरक्षित बाहेर आले; परंतु तुषार दळवी खोल पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनीही आरडाओरडा केला. किनाऱ्यावर गर्दी नसल्यामुळे वेळेत मदत पोचू शकली नाही. हा प्रकार लक्षात आल्याने जवळच असलेल्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तोपर्यंत उशिर झाला होता.

हे पण वाचाघागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ; ग्रामस्थ संतप्त

 

तुषार खोल पाण्यात बुडाला होता. ही माहिती समजल्यानंतर मालगुंड पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक श्रीमती पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल सरगर यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तुषारला पाण्याबाहेर काढण्यात आले. उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man from Kalyan drowned at Malgund beach