महिला लोकप्रतिनिधीशी अश्‍लील संभाषण करणारे युवक अटकेत

महिला लोकप्रतिनिधीशी अश्‍लील संभाषण करणारे युवक अटकेत

वेंगुर्ले/मालवण - सायबर क्राईमच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला यश आले. महिला लोकप्रतिनिधीशी अश्‍लील संभाषण करणाऱ्या आणि बनावट फेसबुक खाते उघडून युवतीची बदनामी करणाऱ्या एकूण दोघांना अटक केली.

मालवण आणि वेंगुर्ले येथे दाखल या दोन्ही गुन्ह्यांमध्ये यशवंत तुकाराम घानवळकर (वय २४, रा. कोचरा-भावईवाडी) आणि अशोक सीताराम कदम (वय २४, रा. आडवली) यांना अटक झाली. 

वेंगुर्लेतील घटनेत मूळ कोचरा येथील रहिवासी व बांदा येथे वास्तव्यास असणाऱ्या यशवंत घावनळेकर याला बांदा येथे ताब्यात घेतले आहे. याला वेंगुर्ले पोलिस स्थानकात अधिक तपासासाठी हजर करण्यात आले आहे. बनावट फेसबुक अकाउंट तयार करून एक अज्ञात युवक आपल्याला अश्‍लील मॅसेज करत आहे, अशी तक्रार निवती पोलिस स्थानकात एका युवतीने केली होती. याचा अधिक तपास वेंगुर्ला पोलिस निरीक्षक शशिकांत खोत करत होते. अशाप्रकारे महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढत असल्याने याचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधीक्षक निमित गोयल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले होते. या पथकाने निवती येथील गुन्ह्याचा अधिक तपास करून बांदा उभाबाजार येथून घावनळेकर याला ताब्यात घेतले. 

त्याला वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ला पोलिस निरीक्षक खोत व कॉन्स्टेबल सुरेश पाटील करीत आहेत. 

दुसऱ्या प्रकरणात मालवणमधील एका महिला लोकप्रतिनिधीच्या मोबाईलवर कॉल करून एक अज्ञात अश्‍लील संभाषण करत होता. याची तक्रार पोलिसांत दिली होती. स्थानिक गुन्हा अन्वेशणच्या मदतीने या संशयिताचा शोध घेण्यात आला. याप्रकरणी अशोक कदम या मूळ आडवली (मालवण) येथील तरुणाला आंब्रड येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला येथील पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com