तो’ युवक पुन्हा बेपत्ता | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारपोलीच्या जंगलात मोबाईल लोकेशन

सावंतवाडी : तो’ युवक पुन्हा बेपत्ता

सावंतवाडी : शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने विषप्राशन केलेला युवक पुन्हा एकदा बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. येथील पोलिस ठाण्यात मंगळवार (ता.९) रात्री उशिरा त्या युवकाच्या पत्नीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशननुसार काल मध्यरात्रीपासून ते आज सायंकाळपर्यंत पारपोली येथील परिसरात, तसेच जंगल भागात शोध घेतला; मात्र तो सापडला नाही.

येथील उभाबाजार परिसरात घडलेल्या दोन वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या युवकाने घटनेच्या दुसऱ्या दिवशी किटकनाशकप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या खून प्रकरणात पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जात असल्याने कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केला, असा दावा त्यावेळी संबंधित युवकाने केला होता.

हेही वाचा: गणपतीमुळे दूषित होणारे धरणाचे पाणी छटपुजेमुळे दुषित होत नाही का?

दुहेरी हत्याकांड प्रकरणाला दहा-बारा दिवस उलटत आले तरी मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. त्याशिवाय यामागचे कारणही स्पष्ट झाले नाही. मध्येच दिवाळीची सुटी आल्यामुळे फॉरेन्सिक लॅबचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब झाला. शुक्रवारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह सावंतवाडी निरीक्षक शंकर कोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह या गुन्ह्यातील तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले होते. दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर आला असतानाच आता या युवकाच्या बेपत्ता होण्याने गुंता वाढला आहे.

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर संबंधित युवकावर बांबोळी-गोवा येथे उपचार करण्यात आले. त्यानंतरर त्याला घरी सोडून दिले होते. युवकावर घरीच गेले काही दिवस औषधोपचार सुरू होते. त्या युवकाकर पोलिसांकडून नजर ठेवली जात होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा हा युवक मंगळवार (ता.९) सायंकाळी साडेचार वाजता घरातून निघून गेला, तो अद्याप घरी परतलेला नाही. काल रात्री उशिरा त्याच्या पत्नीने पोलिस ठाणे गाठल वर्दी दिली. त्यानंतर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही.

हेही वाचा: यवतमाळ : शिकाऊ डॉक्टरच्या हत्येमुळे एमबीबीएसचे विद्यार्थी संतप्त

पोलिसांना त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पारपोली येथील जंगलात आढळून आले. त्यानंतर मोबाईल बंद झाला आहे. आज सकाळी निरीक्षक शंकर कोरे, सहायक निरीक्षक तौफिक सय्यद, उपनिरीक्षक यशवंते, पोलिस कवीटकर यांच्यासह आंबोली पोलिस पथकाने पारपोली जंगल व आंबोली घाटासह दाणोलीपर्यंतचा परिसर पिंजून काढला; मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. त्या युवकाच्या रहस्यमयरीत्या गायब होण्याने या गुन्ह्याला वेगळीच कलाटणी प्राप्त झाली आहे. युवकाने जाताना घरातील दुचाकीसोबत नेलेली नाही.

शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, तो कुठेच आढळून आला नाही. आंबोली घाटातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कैद झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एका नागरिकाला आज सकाळी साडेसातला तो पारपोली परिसरात दिसून आला होता; मात्र त्यानंतर तो कुठे गेला, कोणत्या वाहनाने गेला, याची ठोस माहिती मिळू शकली नाही. या गुन्ह्यात त्याला अन्य कोणाची साथ आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: कोथरुड : वंचितांसाठी काम करणारांचा सन्मान

...म्हणून घेतले नव्हते ताब्यात

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याला सायंकाळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. बेपत्ता युवकाबाबत विचारणा केली असता त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. हा युवक अचानक गायब झाला म्हणजे पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल, त्याने यापूर्वी विष घेतले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याला ताब्यात घेण्यात आले नव्हते. त्याची प्रकृती नाजूक होती. त्यात सुधारणा झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार होती; मात्र यापूर्वीच तो बेपत्ता झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

loading image
go to top