काही सुखद ! तरुणाने तयार केली `यासाठी` लाकडी नाैका

Youth Manufacture One Cores Wooden Boat Ratnagiri Marathi News
Youth Manufacture One Cores Wooden Boat Ratnagiri Marathi News

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - शिवकालापासून लाकडी नौका बांधणीचा वारसा असलेल्या निढळेवाडीतील नौका बांधणीचा व्यवसाय जवळपास ठप्पच होण्याच्या मार्गावर आहे. फायबर बोटींच्या जमान्यात लाकडी नौकांकडे दुर्लक्ष होत असतानाही तोटा सहन करुन येथील तरुण लाकडी नौका तयार करत त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करीत आहेत. येथील एका तरुणाने एक कोटी रुपयांची नौका तयार करुन हा व्यवसाय जिवंत ठेवण्याची आशा निर्माण केली आहे. 

निढळेवाडीमध्ये तयार केलेली नौका शिवाजी महाराजांनी आपल्या सागरी आरमारात सर्वप्रथम वापरल्याचे दाखले इतिहासात आहेत. त्यावेळेपासून सुरू झालेला हा व्यवसाय आजही सुरूच आहे. मच्छीमार व्यावसायिकांनी व्यवसाय करीत असताना प्रतिज्ञापत्रात मी लाकडी नौकेचे वापर करीन, असे शासनाकडे लिहून दिल्यानंतर लाकडी नौका बांधणीसाठी कर्ज उपलब्ध होत होते. व्यावसायिकांचा कल लाकडी नौका तयार करुन घेण्याकडे होता. त्यावेळी निढळेवाडीत मोठ्या प्रमाणात नौकांबाधणीचा व्यवसाय सुरु होता. त्यावेळी जवळपास 300 ते 350 कारागीर हे काम करत होते. 

मात्र शासनाने आता लाकडी नौकांच्याऐवजी फायबर नौका बांधणीची परवानगी दिल्याने मच्छीमार व्यवसायिक फायबर नौकेकडे वळू लागले आहेत. त्यामुळे लाकडी नौकाबांधणीचा व्यवसाय आता जवळपास बंदच होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी निढळेवाडी येथे 13 होड्या बांधण्यात आल्या होत्या. या वर्षी येथे एकाच होडीचे काम सुरु आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर आगामी काळात निढळेवाडीतील कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. 

निढळेवाडीत पूर्वीपासूनच कुशल कारागीर आहेत. येथील सुतारसमाज मोठ्या प्रमाणात नौकाबांधणीचे काम करायचा; मात्र आता नौकाबांधणीचा व्यवसाय ठप्पच होण्याच्या मार्गावर असल्याने येथील कारागिरांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. आपला लाकडी नौका तयार करण्याचा व्यवसाय तोटा सहन करुनही येथील तरुण विरेंद्र सुतार याने जोपासला आहे. त्याने एका व्यापाऱ्याची 1 कोटी रुपयांची लाकडी नौका तयार करुन दिली आहे. 

लाकडी नौकेमध्ये सद्यस्थितीत फायद्यापेक्षा तोटाच सहन करावा लागतो; मात्र पारंपरिक व्यवसाय सुरु राहावा म्हणून आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. 
- विरेंद्र सुतार 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com