शिवसेना-भाजप युतीचे प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

अलिबाग - रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या वाऱ्यांनी आता चांगला जोर पकडला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीला रोखण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू आहे. आघाडीविरोधात भारतीय जनता पक्षाला सोबत घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे आघाडीत सामील होण्याबाबत कॉंग्रेसमध्ये परस्परविरोधी प्रवाह आहेत. 

ही निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. काही दिवसांत आचारसंहिता जारी होईल, हे लक्षात घेऊन आतापासूनच आघाडी व युतीची गणिते मांडली जात आहेत. सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकारी तालुकास्तरावर आढावा घेत आहेत. तो पूर्ण झाल्यानंतर जागावाटप करण्यात येईल. 

जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीची सत्ता आहे. ही आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीत कायम राहणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिले आहेत. या दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. 

शिवसेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेंद्र दळवी, ऍड. राजीव साबळे, श्‍यामकांत भोकरे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेकाप युतीला रोखणे सोपे नसल्याने भारतीय जनता पक्षाला सोबत घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. शिवसेना व भाजपमध्ये युतीची बोलणीही सुरू आहेत. 

कॉंग्रेस कुणासोबत? 
राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेकाप आघाडीत सामील व्हायचे की स्वबळावर लढायचे यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद आहेत. जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र पाटील, माजी आमदार माणिक जगताप हे आघाडीसोबत जाण्यास इच्छुक आहेत. माजी आमदार मधुकर ठाकूर हे आघाडीसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसची भूमिका निश्‍चित झालेली नाही. 

अध्यक्षपदासाठी स्पर्धा 
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलेसाठी राखीव असल्याने या पदावर कोण विराजमान होणार, याची गणितेही बांधली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेकाप आघाडीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्या पक्षाला अध्यक्षपद मिळेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे व जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांची कन्या गीता पालरेचा यांची नावे चर्चेत आहेत. शेकापकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील व विद्यमान अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून मानसी दळवी, आमदार भरत गोगावले यांची पत्नी सुषमा गोगावले यांची नावे चर्चेत आहेत. 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची युती आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांचे नेते लवकरच निर्णय घेतील. अद्याप कोणी किती जागा लढवायच्या याबाबत काहीही ठरलेले नाही. 
- आस्वाद पाटील,  जिल्हा परिषद सदस्य, शेकाप पदाधिकारी. 

भारतीय जनता पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. जागावाटपाबाबत भाजपसोबत चर्चा सुरू आहे. यातून सकारात्मक तोडगा निघेल. 
- महेंद्र दळवी,  जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना. 

Web Title: zp election shiv sean-bjp