जिल्हा परिषद अध्यक्षपद ‘कणकवली’च्या पारड्यात?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता हे पद कणकवली विधानसभा मतदारसंघात दिले जाण्याची शक्‍यता आहे. या पदासाठी संजना सावंत, सावी लोके यांची नावे चर्चेत आहेत.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता हे पद कणकवली विधानसभा मतदारसंघात दिले जाण्याची शक्‍यता आहे. या पदासाठी संजना सावंत, सावी लोके यांची नावे चर्चेत आहेत. विषय समिती सभापतीपदासाठीही कमालीची चुरस आहे. नवे पदाधिकारी निवडताना स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे यांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक समतोल राखावा लागणार आहे. 

जिल्हा परिषद विषय समिती सभापती आणि अध्यक्षांनी नुकताच राजीनामा दिला. आता नव्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. विषय समिती सभापतीपदासाठी २४ ला निवडणूक होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेत राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या २७ सदस्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव सदस्या असलेल्या अनिशा दळवी यांनीही नुकतीच राणे यांची भेट घेतली. त्या स्वाभिमानमध्ये जातील अशी चर्चा आहे. अर्थात त्यांच्याकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. तरीही त्या स्वाभिमानसोबत राहिल्यास पक्षाची दोडामार्ग तालुक्‍यातील ताकद निश्‍चित वाढणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने आठही तालुक्‍यांचा समतोल राखला जाताना महिला व बाल कल्याण समिती पद कोणाला मिळणार? हा उत्सुकतेचा विषय आहे.

अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा कणकवली विधानसभा मतदार संघाला लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. सध्या अध्यक्षपद महिला सदस्यासाठी आरक्षीत आहे. कणकवली मतदार संघातील सावंत, लोके यांची नावे चर्चेत आहेत. अर्थात अंतिम निर्णय राणेंचा असणार आहे. 

विषय समितीसाठी मालवण, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला व दोडामार्ग या पाच तालुक्‍यांत स्पर्धा राहणार आहे. मालवणमध्ये जेरॉन फर्नांडिस यांचे नाव सभापती पदासाठी आघाडीवर आहे. ऐनवेळी महेंद्र चव्हाण यांचे नाव पुढे येऊ शकते. सावंतवाडीत पाच पैकी चार सदस्य महिला आहेत. उत्तम पांढरे एकमेव पुरुष सदस्य आहेत. त्यांना विषय सतिती सभापतीपदी संधी मिळू शकते. या स्पर्धेत पल्लवी पंढरीनाथ राऊळ यांचे नावही चर्चेत आहे. वेंगुर्लेमध्ये तीन सदस्य आहेत. प्रितेश राऊळ नुकतेच शिक्षण व आरोग्य सभापती पदावरून उतरले आहेत. त्यामुळे विष्णुदास कुबल व समिधा नाईक हे दोन सदस्य स्पर्धेत आहेत. नाईक यांचे नाव महिला व बाल कल्याणसाठी चर्चेत आहे. कुबल यांना उपाध्यक्ष पदाची लॉटरी लागू शकते. 

पदे चार तालुके पाच
समाजकल्याण सभापतीपदी कुडाळ तालुक्‍यातील ओरोस मतदार संघातून निवडून आलेले अंकुश जाधव यांची पुन्हा वर्णी लागणार आहे. कणकवलीला अध्यक्षपद मिळाल्यास कणकवली, कुडाळ तालुके स्पर्धेतून बाहेर पडतील. वैभववाडीत शारदा कांबळे या एकमेव स्वाभिमानच्या सदस्या आहेत; मात्र त्या समाजकल्याण सभापती म्हणून नुकत्याच पायउतार झाल्या आहेत. परिणामी वैभववाडी तालुका स्पर्धेत राहणार नाही. दोडामार्गमध्ये स्वाभिमानचा एकही सदस्य नाही; मात्र राष्ट्रवादीच्या दळवी आणि त्यांचे पती शैलेश दळवी यांनी नुकतीच राणे यांची भेट घेतली. त्यांनाही सभापतीपद दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे विषय समिती पदांसाठी आता ‘चार पदे, पाच तालुके’ अशी स्थिती आहे.
 

Web Title: ZP President Election special