जिल्हा परिषदेच्या शाळांत चैतन्यमय, उत्साही वातावरण

अमित गवळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

उन्हाळी शिबीरास विदयार्थ्यांचा दांडगा प्रतिसाद आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात शाळेविषयी गोडी निर्माण होत आहे.परिक्षा संपुन सुद्धा विद्यार्थी अावडीने शाळेत येत आहेत. या सगळ्याचा फायदा जिल्हा परिषद शाळांचे पट वाढण्यास नक्कीच होईल.
- दिलीप गावीत, मुख्याध्यापक, राजिप डिजिटल व टॅब शाळा, धोंडसे

पाली : रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये सध्या चैतन्यमय व उत्साही वातावरण पहायला मिळत आहे. कारण अाहे ते म्हणजे रायगड जिल्ह्या परिषदेच्या शाळांत पहिल्यांदाच राबविले गेलेले उन्हाळी शिबीर. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व अध्ययन स्तर उंचावण्याबरोबरच त्यांना शाळेची गोडी देखिल लागत आहे.

सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात परिक्षा संपल्या व मुल्यमापन झाल्यावर विदयार्थी शाळेत उपस्थीती दाखवित नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक शैक्षणिक व सहशैक्षणिक बाबी व उपक्रमांना मुकावे लागते. हि गळती थांबावी व विदयार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभय यावलकर यांना हि संकल्पना सुचली. त्यानुसार जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण विभाग यांनी या वर्षीपासून जिप शाळांमध्ये उन्हाळी शिबीर अायोजित केले. जिल्हयात पहिल्यांदा सर्व जिप शाळांमध्ये सोमवारी (ता.२३) पासून नियोजनबद्धपणे "उन्हाळी शिबीर " राबविले जात आहे. या शिबीराची सांगता शुक्रवारी (ता.४) होणार आहे. या शिबीरामुळे मुले अतिशय अानंदाने शाळेत येत असुन यातील प्रत्येक उपक्रमात व स्पर्धेत हिरहीरीने सहभागी होत आहेत. त्यांच्यात व्यक्तीमत्त विकास जोमात होत असुन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक देखिल सर्व उपक्रम व स्पर्धा अतिशय प्रभावीपणे राबवित आहेत. रोजच्या उपक्रमाचे हजारो फोटो शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकार्यांच्या व्हाॅट्सअप ग्रुपवर येत आहेत.

असे अाहे "उन्हाळी शिबीर "
शाळेत राबविण्यात येणार्या ९ दिवशीय उन्हाळी शिबीराचे नियोजन प्रत्येक शाळेला देण्यात आले आहे. त्यानुसार दर दिवसांचा उपक्रम व स्पर्धा शालेय वेळांमध्ये उपलब्ध साधने व साहित्य तसेच लोकसहभाग व तज्ज्ञांच्या सहाय्याने शिक्षक व मुख्याध्यापक प्रभावीपणे राबवित आहेत.विद्यार्थ्यांने या दिवसांत शाळेत दफ्तराविना यायचे अाहे. तसेच शाळेचा गणवेश देखिल बंधनकारक नाही. शालेय वेळात विद्यार्थ्यांनी हे उपक्रम करायचे आहेत. त्यामूळे विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड वाढला अाहे. शाळेची गोडी त्यांना लागली असून त्यांच्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. या सर्व गोष्टीचा उपयोग विदयार्थ्यांच्या पुढिल शैक्षणीक व सर्वांगीन विकास व वाढीसाठी होणार अाहे.

शिबीराचे नियोजन
पहिल्या दिवस सोमवार – चित्रकला स्पर्धा, दुसरा दिवस – रांगोळी स्पर्धा,तिसरा दिवस – मनोरंजनात्मक किंवा पारंपारीक खेळ, चौथा दिवस – नाट्यीकरण, गोष्टी, गाणी व कथा, पाचवा दिवस – कविता व बडबडगीते गायन, सहावा दिवस – मातीकाम (क्ले मोल्डिंग), सातवा दिवस – इंग्लिश डे (जमेत तशे इंग्रजी बोलणे), आठवा दिवस – पारंपारीक वेशभुषा व मुखवटे, नववा दिवस – "मला काय व्हायचं अाहे" या बाबत विदयार्थ्यांशी चर्चा, तज्ज्ञांची उपस्थिती अाणि स्नेह भोजन असे नऊ दिवसांचे नियोजन आहे.

रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर अायोजित करण्यात आले आहे.विदयार्थ्यांचा वैक्तिमत्व विकास व्हावा, त्यांना शाळेची गोडी व अावड निर्माण व्हावी त्याबरोबरच त्यांना अानंदायी शिक्षण मिळावे या उद्देशाने हे उन्हाळी शिबिर राबविले जात आहे. या शिबिरामुळे विदयार्थ्यांची शाळेतील उपस्थीती वाढेल, शैक्षणिक व अध्ययन स्तर उंचावेल. या शिबीराला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असुन शाळा शाळांमध्ये चैतन्यमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व जिप पदाधिकारी, क्रमचारी,मुख्याध्यापक व शिक्षक विदयार्थ्यांच्या साथीने हि संकल्पन प्रभावीपणे राबवित आहेत.
- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद, रायगड

उन्हाळी शिबीरास विदयार्थ्यांचा दांडगा प्रतिसाद आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात शाळेविषयी गोडी निर्माण होत आहे.परिक्षा संपुन सुद्धा विद्यार्थी अावडीने शाळेत येत आहेत. या सगळ्याचा फायदा जिल्हा परिषद शाळांचे पट वाढण्यास नक्कीच होईल.
- दिलीप गावीत, मुख्याध्यापक, राजिप डिजिटल व टॅब शाळा, धोंडसे

 

शाळेतील असा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला. सर्व स्पर्धांत मी सहभाग घेतेय. मला शाळेत जाम मजा येतेय. सर्व शिक्षक व विदयार्थी खुप अानंदी अाहेत. खूप गोष्टी शिकायलापण मिळत आहेत.
- माधूरी शाम जाधव, विद्यार्थीनी ईयत्ता ५ वी, राजिप डिजिटल व टॅब शाळा,धोंडसे

Web Title: zp school celebration