जि. प. शाळांना पटसंख्या राखणे कठीण

भूषण आरोसकर
गुरुवार, 18 मे 2017

मुलांची संख्या घटतेय - १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४३५ वर

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आले तरी अद्यापपर्यंत हवे तसे नियोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला आयत्यावेळी नव्या मुलांची शोधमोहीम राबवावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

जिल्ह्यातून नागरिकांचे रोजगारांसाठी होणारे स्थलांतर व रोजगाराच्या साधनांचा अभाव ही कारणेही पट कमी होण्यास जबाबदार ठरली आहेत. सध्या २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षानुसार जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या ४३५ एवढ्या शाळा आहेत.

मुलांची संख्या घटतेय - १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४३५ वर

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आले तरी अद्यापपर्यंत हवे तसे नियोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला आयत्यावेळी नव्या मुलांची शोधमोहीम राबवावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

जिल्ह्यातून नागरिकांचे रोजगारांसाठी होणारे स्थलांतर व रोजगाराच्या साधनांचा अभाव ही कारणेही पट कमी होण्यास जबाबदार ठरली आहेत. सध्या २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षानुसार जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या ४३५ एवढ्या शाळा आहेत.

जिल्ह्यात रोजगारांसाठी हवा तसा वाव नाही. याचा फटका आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर दिसून येत आहे. बदलत्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे बरेचसे विद्यार्थी दिसून येतात. याला मराठी शाळा म्हणजे जुन्या व मागासलेल्या शिक्षण पद्घती त्यामुळेच जिल्हा परिषदेपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी वळतात असा ठपका बरेच जण लावतात; परंतु हे काही अर्थीच ठीक म्हणावे लागेल. खरे पाहता जिल्ह्याच्या आर्थिक बाजूचा असक्षमपणा याला जबाबदार दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या संपन्न असला तरी येथे पाहिजे तशा रोजगाराच्या संधीचा अभाव कित्येक वर्षांपासून आहे. मुळात रोजगारच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातून स्थलांतरणाची वेळ अनेकांवर आली आहे. चांगल्या नोकऱ्यांचा शोध जिल्ह्याबाहेर जाऊन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबनियोजन करण्याच्या विचारात अनेकजण स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थी संख्याही आपोआप जिल्ह्याबाहेर जात आहे. याचा एकूणच परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्येवर होताना दिसून येत आहे. 

जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांत पहिलीपासून मुले दाखल होणार असल्याने या पटसंख्येत यात काही प्रमाणात बदल होणार आहेत. असे असले तरी बऱ्याच शाळांचे भवितव्य पटसंख्येचा विचार करता टांगणीला लागलेले आहे. बदलत्या काळात बऱ्याच ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा स्थापन होत आहेत. फक्त योग्य शिक्षण पद्धती असणेच महत्त्वाचे नाही, त्याचबरोबरीने आकर्षक पायाभूत सुविधा या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुक, शैक्षणिक सुविधा, दर्जेदार मागदर्शन याचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळापेक्षाही सरस ठरत आहेत. शासनाची जिल्हा परिषदेच्या शाळातील पट टिकविण्यासाठी याआधीच हालचाल करणे आवश्‍यक होते; मात्र उदासिनतेचा फटका आता लवकरच कमी पटसंख्येच्या शाळांना दिसून येणार हे नक्की. शाळा टिकून राहाव्यात यासाठी शिक्षकातर्फे विविध उपक्रम ग्रामीण व स्थानिक स्तरावर राबविण्यात येतात. राज्यशासनाकडून विविध जीआर ची अमंलबजावणीही करण्यात येते. यात प्रामुख्याने शाळा बाह्यमुलांचा शोध घेवून शिक्षण प्रवाहात आणण्याचे प्रयत्न, वाड्या वस्ती स्तरावर मुलांचे सर्वेक्षण, शिक्षक-पालक समन्वय, मागदर्शने असे विविध उपक्रम वर्षभर चालूच असतात; परंतु फारसा उपयोग पट वाढविण्यास होत नाही. जिल्ह्यातील शाळांचे पुढे काय होणार आणि शाळा बंद झाल्यावर शिक्षकांचे काय होणार याची माहिती शिक्षण विभागच जाणे.

नव्या पटसंख्येकडे लक्ष
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ नुसार जिल्ह्यात ४१ हजार ८५६ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत होते. यात देवगड तालुक्‍यात ७०७१, दोडामार्ग २०३६, कणकवली ७१६३, कुडाळ ८३७३, मालवण ३९६८, सावंतवाडी ६४१९, वेंगुर्ले ४१६८, वैभववाडी २६५८ यांचा समावेश आहे. १४५५ एवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्ह्यात आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर शाळा पटसंख्येत किती बदल होतो, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष आहे.

‘एक गाव, एक शाळा’ कागदावरच
अलीकडेच शासनस्तरावर काढलेली ‘एक गाव, एक शाळा’ संकल्पना कागदोपत्रीच राहिली. काही वर्षांपूर्वीच पटसंख्येच्या वाढीसाठी कमी पटसंख्येच्या शाळा जोडण्यासाठी शिक्षण विभागाने याची घोषणा केली होती; मात्र धोरणात्मक संकल्पना राबविण्यासाठी सूचना व नियमासोबत अंमलबजावणीची गरज असते ती शिक्षण विभागात दिसून आलेली नाही.

Web Title: zp school maintain the difficult number of students