काम झाले 20 टक्के; निधी दिला 60 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापकाला जिल्हा परिषदेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्गखोल्यांचे केवळ 20 टक्के काम होऊनही ठेकेदाराला 60 टक्के निधी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चार वर्षांनंतरही हे काम अपूर्ण आहे. 

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापकाला जिल्हा परिषदेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्गखोल्यांचे केवळ 20 टक्के काम होऊनही ठेकेदाराला 60 टक्के निधी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चार वर्षांनंतरही हे काम अपूर्ण आहे. 

2013-14 मध्ये सर्व शिक्षा अभियानामधून या प्राथमिक शाळेत दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. त्यासाठी 10 लाख 30 हजार इतका निधी मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदेने तो सर्व झुगरेवाडी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला. समितीचे एक सदस्य संजय सावळा यांनाच या खोल्या बांधण्याचा ठेका देण्यात आला. शाळेची दोन वर्गखोल्या असलेली एक इमारत आहे. आरसीसी पद्धतीने बांधलेल्या या इमारतीच्यावर पहिल्या मजल्यावर दोन वर्गखोल्या बांधण्याचे काम सावळा यांना देण्यात आले. या ठिकाणी चार वर्षांत जेमतेम आरसीसी पद्धतीने कॉलम उभे केले आहेत. यापोटी तब्बल साडेसहा लाखांचे बिल मंजूर करून तसा धनादेश तत्कालीन मुख्याध्यापक छगन मेंगाळ यांनी ठेकेदाराला अदा केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात जेमतेम अडीच लाख रुपये खर्चाचे काम झाले आहे, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानाचे शाखा अभियंता संदीप पाटील यांनी दिली. 

सर्व शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असते. तीन वर्षांपूर्वी ठेकेदाराला साडेसहा लाखांचा धनादेश दिलेले मुख्याध्यापक मेंगाळ यांची बदली मे 2016 मध्ये कर्जत तालुक्‍यातील कोठिंबे येथे प्राथमिक शाळेत झाली. विद्यमान मुख्याध्यापक रवी काजळे यांच्याकडे अनेक जण माहितीच्या अधिकारात बांधकामाची माहिती मागत आहेत. 

अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या निविदेप्रमाणे शाळेचे बांधकाम झाले पाहिजे, अशी मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी यांनी केली आहे. 

झुगरेवाडी शाळेत दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी जेमतेम अडीच लाख रुपये खर्चाचे काम झाले आहे. असे असताना साडेसहा लाखांचे बिल अदा करण्यात आल्याने गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे. 
- संदीप पाटील,  शाखा अभियंता, सर्व शिक्षा अभियान

Web Title: zugarewadi zp school