esakal | Love Story : अंजलीने केले होते सचिनला प्रपोज, मागणीही घातली

बोलून बातमी शोधा

Anjali Proposed To SACHIN Became REPORTER To Meet

सचिनने ‘प्लेइंग इट माय वे’ आत्मचरित्रात या सगळ्या आठवणींचे वर्णन केले आहे. हे किस्से खास eSakal.com च्या वाचकांसाठी... 

Love Story : अंजलीने केले होते सचिनला प्रपोज, मागणीही घातली
sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (ता. २४ एप्रिल) वाढदिवस. सचिनने आपल्या फलंदाजीने क्रिकेटरसिकांना अक्षरश: वेड लावले होते; पण सचिनला वेड लावले ते अंजलीने. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अंजलीने सचिनला प्रपोज केले. एवढेच नाही, तर मोठ्या धाडसाने घरी जाऊन त्याला मागणीही घातली. पहिल्यांदा भेटण्यासाठी ती चक्क ‘पत्रकार’ म्हणून त्याच्या घरी गेली होती. सचिनने ‘प्लेइंग इट माय वे’ आत्मचरित्रात या सगळ्या आठवणींचे वर्णन केले आहे. हे किस्से खास eSakal.com च्या वाचकांसाठी... 
 

विमानतळावर नजरानजर 

सचिन इंग्लंड दौऱ्याहून परत आला, तेव्हा विमानतळावर केशरी रंगाचा टीशर्ट परिधान केलेली सुंदरी दिसली. सचिन तिच्यावर भाळला. दोघांचीही नजरानजर झाली अन् दोघांनीही एकमेकांचे काळीज चोरले. अंजली विमानतळावर तिच्या आईची वाट पाहत होती. त्याचवेळी तिला कुरळ्या केसांचा सचिन दिसला. ती ‘सचिन सचिन’ म्हणत त्याच्या फॅन्ससोबत त्याच्यामागे मागे चालत गेली. ती मागे येत असल्याचे पाहून सचिन लाजून चूर झाला. अंजलीची छबी डोळ्यांत साठवूनच तो कारमध्ये बसला. तेव्हा अंजली वैद्यकीय शिक्षण घेत होती. भगव्या रंगाचा टीशर्ट घालून आलेली अंजली सचिनच्या स्मृतिपटलावर कायमची राहिली. अंजलीने तो लकी टीशर्ट अजूनही जपून ठेवला आहे. 

 
‘पत्रकार’ बनून गेली थेट सचिनच्या घरी... 

सचिनला भेटण्याची ओढ अंजलीला स्वस्थ बसू देत नव्हती. सचिनने तिची झोप उडवली होती. तिकडे सचिनचीही हीच अवस्था होती. सचिनला भेटण्‍यासाठी अंजली चक्क पत्रकार म्‍हणून त्याच्या घरी गेली होती. तेव्‍हा सचिनच्‍या आईने तिला ‘तू खरोखर पत्रकार आहेस का?’ असा प्रश्‍न केला होता. तेव्‍हा अंजलीची भंबेरीही उडाली होती. याशिवाय अंजलीने सचिनला ‘चॉकलेट’ गिफ्ट केल्यानंतर सर्व प्रकार आईच्या लक्षात आला होता. 

हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम? 
 

मित्रांकडून मिळवला नंबर, फोनवर प्रपोज 

सचिनशिवाय अंजलीला चैन पडत नव्हते. सारखा सचिनचा विचार मनात येत होता. तिकडे सचिनची तीच अवस्था होती. अंजलीने मित्रांकडून सचिनचा नंबर मिळविला. फोन केला. तिने सांगितले, मी तुला विमानतळावर पाहिले. तू मला आवडला. तेव्हा सचिन म्हणाला की, मी तुला पाहिले असून, तू केशरी टीशर्ट परिधान केला होता आणि माझ्या गाडीमागे धावत होती. तेव्हा तिला कळले की, सचिनही आपल्या प्रेमात आहे. 
 

घरी जाऊन घातली लग्नाची मागणी 

आपल्या आई-वडिलांना अंजलीविषयी सांगायला सचिन घाबरत होता. मग अंजलीच सचिनच्या घरी गेली. सचिनच्या कुटुंबीयांना तिने सर्वकाही सांगितले. एवढेच नाही, तर सचिनची मागणीही घातली. तेव्हा सचिन न्यूझीलंड दौऱ्यावर होता. दोघे एकमेकांना पत्र लिहीत असत. माझ्यासाठी फलंदाजीपेक्षा अंजलीला पत्र लिहिणे कठीण असल्याचे सचिनने म्हटले एकदा म्हटले होते. सचिन म्हणाला, की पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, तेव्हा पत्राद्वारेच भावनांची आदान-प्रदान होत असे. मी पत्र लिहिल्यास कित्येक वेळ ते वाचत असे आणि नंतरच अंजलीला पाठवत असे. अंजलीचे अक्षर खूप सुंदर आहे.