क्रिकेटपूर्वी बालपणीच सचिन झळकला होता सिनेमात

विकास देशमुख
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सचिनने एका हिंदी चित्रपटात छोटी भूमिका केली होती. विशेष म्हणजे या सिनेमात तो झळकला तो क्रिकेटर म्हणूनच.

औरंगाबाद : क्रिकेटचा देव, विक्रमाचा बादशहा अशी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ओळख आहे. सचिनचे चाहते जगभर आहेत. सचिनच्या आयुष्यावर ‘सचिन’ हा हिंदी चित्रपटही येऊन गेला. त्यात स्वतः सचिन मुख्य भूमिकेत आहे; पण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सचिनने एका हिंदी चित्रपटात छोटी भूमिका केली होती. विशेष म्हणजे या सिनेमात तो झळकला तो क्रिकेटर म्हणूनच. सचिनच्या वाढदिवसानिमित्त याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी... 

कोणता आहे तो चित्रपट? 

भारतीय संघाने विश्वकप जिंकून दोनच वर्षे झाली होती. हॉकीला मागे टाकून क्रिकेट हा खेळ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला होता. गावोगावी क्रिकेटचे फॅन वाढत होते. याच क्रिकेट चाहत्यांना टार्गेट ग्रुप ठरवून त्यांच्यासाठी निर्माता-दिग्दर्शक विजय सिंह यांनी खास क्रिकेट आणि क्रिकेटर या कथासूत्रावर ‘कभी अजनबी थे’ या चित्रपटाची निर्मिती केली. वर्ष १९८५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

यात मुख्य भूमिकेत म्हणजेच हिरो होते ते प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील. विशेष म्हणजे भारतीय संघाचे त्यावेळचे विकेटकीपर सय्यद किरमानी यांनी यामध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यांच्यासोबत पूनम ढिल्लो, देवश्री रॉय, इफ्तिखार, सीमा देव, संदीप पाटील, शक्ती कपूर आणि आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर यांनीही यामध्ये भूमिका साकारल्या. 

सचिनला अशी मिळाली संधी 

याबाबत संदीप पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की ‘‘नुकताच आम्ही विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने मनामनांत स्थान मिळवलेले होते. त्यावेळी मी ‘कभी अजनबी थे’ या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. चित्रपटाचे कथानक क्रिकेटवरच आधारित असल्याने एका दृश्यासाठी आम्हाला क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या मुलांचे दोन संघ लागणार होते. मुंबईच्या चेंबूर येथील आरसीएफ ग्राऊंडवर चित्रीकरण सुरू होते. त्यासाठी २१ बालक्रिकेटर्सही आले. त्यांना दीपक मुरारकर यांनी आणले होते.

या २१ मुलांमध्ये होता तो दहावर्षीय सचिन. त्याच वेळी मी त्याच्या डोळ्यांत चमक आणि पायात चपळता पाहिली. मुलांना घेऊन येणाऱ्या दीपकला मी त्या मुलाविषयी विचारले, त्यांनी सांगितले की, या मुलाचे नाव सचिन तेंडुलकर आहे. त्या वेळी मी वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात होतो. मात्र, तो मुलगा मला वर्ल्डकप ट्रॉफी असल्यासारखा पाहत होता. दीपकने मला सांगितले, या मुलाची खूपच चर्चा आहे, तुम्ही त्याचा खेळ एकदा तरी पाहा. हा मुलगा खेळात मोठे नाव करेल हे मला तेव्हाच समजले होते.’’ 

हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम? 

  
काय होती सचिनची भूमिका? 

चित्रपटातील हिरो (संदीप पाटील) स्टार क्रिकेटर असतो; पण त्याच्या करिअरला उतरती कळा लागते. नैराश्याने त्याला ग्रासलेले असते. त्यावेळी त्याचा मित्र त्याला सल्ला देतो, की हतबल होऊ नको. नव्या मुलांना शिकव. मग ते क्रिकेटची आवड असलेल्या २१ मुलांना ट्रेनिंग देतात. त्या २१ पैकी एका मुलाच्या भूमिकेत सचिनसुद्धा आहे. एकूण दीड मिनिटांचे हे दृश्य आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did You Know Sachin Tendulkar Was Actor Also Did You Know Sachin Tendulkar Was Actor Also