श्रेयस अय्यरमुळे मुंबईचा सलग दुसरा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - श्रेयस अय्यरच्या नाबाद पाऊण शतकामुळे मुंबईने पश्‍चिम विभागीय ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत गुजरातचा पाच विकेट व 10 चेंडू राखून पराभव केला. उपयुक्त अष्टपैलू प्रवीण तांबेने त्यापूर्वी गुजरातला सव्वाशेच्या आसपास रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. मुंबईसाठी हा विजय खूपच मोलाचा आहे. रणजी स्पर्धेत गुजरातने मुंबईविरुद्धची साखळी, तसेच अंतिम लढत जिंकली होती. त्याचा काहीसा वचपा मुंबईने काढला. त्याचबरोबर सलग दुसरा विजय मिळवत विभागीय विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली.

श्रेयसने सहा चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. त्याने अजिंक्‍य रहाणेसह 42 धावांची भागीदारी करीत विजयाचा भक्कम पाया रचला. मात्र त्यापेक्षाही सहकारी एकापाठोपाठ बाद होत असताना एक बाजू भक्कमपणे लावून धरली; तसेच आवश्‍यक धावगती कधीही आवाक्‍याबाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली. तत्पूर्वी रुजुल भट व जेसल कारिया सोडल्यास गुजरातच्या एकाही फलंदाजास दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. 45 वर्षीय प्रवीण तांबे व प्रथमेश डाके यांच्या प्रभावी माऱ्याने गुजरातला 131 धावांत रोखले.

संक्षिप्त धावफलक - गुजरात - 9 बाद 131 (रुजुल भट 47- 33 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकार, जेसल कारिया 36- 32 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार; प्रथमेश डाके 3-0-13-2, प्रवीण तांबे 4-0-19-2) पराजित वि. मुंबई ः 18.2 षटकांत 5 बाद 132 (श्रेयस अय्यर नाबाद 79- 49 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार, अजिंक्‍य रहाणे 25- 30 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार; रोहित दहिया 3.2-0-18-2, रुजुल भट 4-0-32-2).

Web Title: 20-20 cricket competition