भारताचा सलग तिसरा विजय; विराटचे 34 वे शतक

Thursday, 8 February 2018

303 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 179 धावांत आटोपला. हशीम आमला फक्त एका धावेवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार मार्करमने ड्युमिनीसोबत डाव सावरला. कुलदीपने मार्करमला पहिल्याच षटकात बाद करताना टाकलेला चायनामन चेंडू फसवा होता. पापणी लवायच्या आत धोनीने मार्करमला स्टंप केले. धोनीचा हा विकेट किपर म्हणून 400 वा बळी होता.

केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या शतकी तडाख्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी चहल-कुलदीप यांच्या फिरकीचे कोडे कायम राहिले. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आफ्रिकेला 124 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. चहल-कुलदीप यांनी प्रत्येकी चार विकेट टिपल्या. भारताने याबरोबरच सहा सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. 

303 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 179 धावांत आटोपला. हशीम आमला फक्त एका धावेवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार मार्करमने ड्युमिनीसोबत डाव सावरला. कुलदीपने मार्करमला पहिल्याच षटकात बाद करताना टाकलेला चायनामन चेंडू फसवा होता. पापणी लवायच्या आत धोनीने मार्करमला स्टंप केले. धोनीचा हा विकेट किपर म्हणून 400 वा बळी होता.

पदार्पण करणाऱ्या क्‍लासेनला चहलची फिरकी ओळखणे कठीण गेले. जेव्हा चहलने अर्धशतक करून खेळणाऱ्या ड्युमिनीला पायचित केले तेव्हा मोठा धक्का दक्षिण आफ्रिकन संघाच्या धावांच्या पाठलागाला बसला. नेहमी मोठे फटके मारणारा डेव्हिड मिलर काय किंवा ख्रिस मॉरीस काय सगळे फिरकीला बाद झाले. 

त्यापूर्वी, कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 303 धावा करून यजमानांपुढे पुन्हा एकदा कठीण आव्हान ठेवले. कोहलीच्या नाबाद 160 धावांच्या खेळीला सुरवातीला शिखर धवनची (76) सुरेख साथ मिळाली. 

मार्करमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले. दक्षिण आफ्रिकन संघातून विकेट किपर फलंदाज म्हणून क्‍लासेन आणि लुंगी एन्गिडीला एकदिवसीय सामन्यात पदार्पण करायची संधी दिली गेली. रबाडाने पहिल्याच षटकात रोहित शर्माला शून्यावर बाद करून धमाल उडवली. सुरवातीला विकेट थोडी साथ देत असल्याने रबाडाने विराट कोहलीला चांगलीच खुन्नस देत गोलंदाजी केली. नेहमी आक्रमक देहबोली असणाऱ्या कोहलीने प्रगल्भता दाखवत शांत डोक्‍याने खेळत जम बसवला. नजर बसल्यानंतर कोहली - शिखर धवन जोडीने गोलंदाजांचा समाचार घेणे चालू केले. शिखर धवन जास्त ताकदवान फटके मारत होता. 

न्यूलंड्‌स मैदानाची सीमारेषा लांब असल्याने मोकळ्या जागेत चेंडू मारून दोन धावा पळण्याचा सपाटा धवन -कोहलीने चालू ठेवला. खराब चेंडूंना चांगल्या ताकदीने मारून दोघे फलंदाज चार धावा वसूल करत होते. शतकी भागीदारी तोडायला अखेर जे पी ड्युमिनीची बदली गोलंदाजी कामी आली. ड्युमिनीला पुढे सरसावत मारताना उडालेला शिखर धवनचा कठीण झेल कप्तान मार्करमने डावीकडे झेपावत टिपला. शिखर धवनने 76 धावा केल्या. 

त्यानंतर विराट कोहलीने एकट्याने धावा जमा करणे चालू केले. समोरून अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पंड्या, महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधव असे चार फलंदाज स्वत:च्या चुकीने बाद झाले. कोहलीवर त्याचा परिणाम झाला नाही. 34वे एकदिवसीय शतक पूर्ण करताना विराटला 119 चेंडू लागले. शतक करताना विराटने फक्त 7 चौकार मारले होते या वरून त्याची मोकळ्या जागेत चेंडू मारायची आणि नंतर न थकता धावा पळण्याची क्षमता लक्षात येते.

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 6 बाद 303 (विराट कोहली नाबाद 160 -159 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार, शिखर धवन 76 -63 चेंडू, 12 चौकार, जेपी. ड्युमिनी 2-60) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका ः 40 षटकांत सर्व बाद 179 (हशीम आमला 1, एडन मार्करम 32, जेपी ड्युमिनी 51-67 चेंडू, 4 चौकार, डेव्हिड मिलर 25, ख्रिस मॉरीस 14, कागिसो रबाडा 12, बुमरा 7-0-32-2, युजवेंद्र चहल 9-0-46-4, कुलदीप यादव 9-1-23-4)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3rd ODI India beat South Africa by 124 runs to take lead