भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले होते. फलंदाजीस कठीण असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना विंडीजच्या फलंदाजांना रोखले होते.

अँटिग्वा - विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरच्या माऱ्यापुढे भारतीय क्रिकेट संघ 190 धावांचे आव्हान पार करण्यात असमर्थ ठरला आणि भारताला विंडीजकडून 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतरही पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे.

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले होते. फलंदाजीस कठीण असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना विंडीजच्या फलंदाजांना रोखले होते. भारताकडून उमेश यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. कुलदीप यादवने आपला चमकदार कामगिरी कायम ठेवताना दोन बळी मिळविले. विंडीजचे सलामीचे फलंदाज वगळता मधल्या आणि तळातील फलंदाजांनी निराश केली.

या आव्हानासमोर भारताची सुरवात खराब झाली. शिखर धवन अवघ्या पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि कार्तिकही स्वस्तात माघारी गेल्याने भारताची 3 बाद 47 अशी अवस्था झाली. मात्र, अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंह धोनीने भारताचा डाव सावरत संघाची धावसंख्या शतकापार नेली. रहाणे 60 धावांवर बाद झाल्यानंतर भारताने पुन्हा झटपट गडी गमाविले. धावांची गती कमी राखल्याने भारतीय खेळाडूंवर अखेरच्या षटकांमध्ये दबाव आला. धोनीकडून विजयाची अपेक्षा असताना तो 54 धावांवर बाद झाला आणि भारताच्या विजयाचा आशा संपुष्टात आला. जेसन होल्डरने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करत पाच बळी मिळविले. 

Web Title: 4th ODI: West Indies beat India to keep series alive