"स्पायडरमॅन' थकला... डिव्हिलियर्सची निवृत्ती 

वृत्तसंस्था
Wednesday, 23 May 2018

मी आता थकलो आहे, या क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. 114 कसोटी, 228 वन-डे आणि 78 ट्‌वेंटी-20 सामने खेळल्यानंतर आता माझी जागा दुसऱ्या कोणी तरी घेण्याची वेळ आली आहे. माझा खेळ मी खेळलो आहे. मनापासून सांगतो मी थकलो आहे. 
- एबी डिव्हिलियर्स 

जोहान्सबर्ग - आयपीएलमध्ये काहीच दिवसांपूर्वी अद्‌भुत झेल पडकल्यामुळे स्पायडरमॅनची उपमा मिळालेल्या एबी डिव्हिलियर्सने "आता आपण थकलो आहोत', असे सांगत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले. आयपीएलमधून त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर चार दिवसांतच "ट्‌विटर'वरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय कठीण होता. या निर्णयासाठी मी खूप विचार केला. बऱ्यापैकी योगदान देत असतानाच निवृत्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकांमध्ये चांगले यश मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ असल्याचे मला जाणवले. 

सहकाऱ्यांचा सदैव ऋणी 

दक्षिण आफ्रिकेकडून आता आपण कोणत्या प्रकारात खेळायचे हे मी स्वतः ठरवणे योग्य नाही. माझ्यासाठी देशाकडून खेळणे सर्वस्व होते. देशाकडून खेळताना प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि क्रिकेट मंडळाने दिलेल्या सहकार्याचा मी सदैव ऋणी आहे. देशाकडून खेळताना मला मिळालेल्या सर्व संघ सहकाऱ्यांचा मी अधिक ऋणी आहे. त्यांचे सहकार्य नसते, तर मी अर्ध्याहूनही अधिक यश मिळवले नसते, अशी भावना डिव्हिलियर्सने व्यक्त केली. 

सर्वच ठिकाणी केवळ फायद्यासाठीच खेळायचे असते असे नाही. जेव्हा ताकद कमी होत असते, तेव्हा आपली वेळ आली हे समजायचे आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीला अखेर असते, असे सांगताना डिव्हिलियर्सने तुमच्या भावना मी समजू शकतो, असे भावनिक उद्‌गार काढत चाहत्यांचेही आभार मानले. 

परदेशात कोठे खेळत राहण्याचा माझा विचार नाही; मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये टायटन्स संघासाठी मी उपलब्ध असेन. दक्षिण आफ्रिका आणि कर्णधार फाफ डु प्लेसिसचा मी कायम कमालीचा पाठीराखा राहीन, असेही डिव्हिलियर्स म्हणाला. 

मी आता थकलो आहे, या क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. 114 कसोटी, 228 वन-डे आणि 78 ट्‌वेंटी-20 सामने खेळल्यानंतर आता माझी जागा दुसऱ्या कोणी तरी घेण्याची वेळ आली आहे. माझा खेळ मी खेळलो आहे. मनापासून सांगतो मी थकलो आहे. 
- एबी डिव्हिलियर्स 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AB de Villiers announces retirement from international cricket