World Cup 2019 : अखेरच्या वर्ल्डकप लढतीत गेल अपयशी, तरीही विंडीजचे त्रिशतक

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

आपल्या अखेरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला, परंतु इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे विंडीजने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकी मजल मारली. 

लीडस् : आपल्या अखेरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला, परंतु इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे विंडीजने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकी मजल मारली. 

अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने युनिव्हर्सल बॉस म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या फलंदाजीची उत्सुकता होती. सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत तो मैदानात उतरला. एरवी तुफानी टोलेबाजी करणाऱ्या गेलला आज 18 चेंडूत सातच धावा करता आल्या आणि एकच षटकार मारता आला. 

गेल अपयशी ठरला तरी एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन यांनी अर्धशतके केली तर हेटमायर आणि जेसन होल्डर यांनीही आक्रमक फलंदाजी केली. स्पर्धेतल्या पहिल्या एकमेव विजयाच्या शोधात असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगला मारा केला, परंतु सूमार क्षेत्ररक्षणाने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. अर्धशतके करणाऱ्या होप आणि पूरन यांचे सोपे झेल सोडण्यात आले. 

झेल सोडण्यात आले तरी विंडीजला तिनशे धावांच्या आत रोखण्याची संधी अफगाणिस्तानला मिळाली होती, परंतु अंतिम दहा षटकांत विंडीजने तब्बल 111 धावां कुटल्या. अखेरचे चार चेंडू शिल्लक असताना फलंदाजीस आलेल्या ब्राथवेटने एक षटकार आणि दोन चौकार मारून संघाला तिनशे धावांचा टप्पा पार करून दिला. 

संक्षिप्त धावफलक ः वेस्ट इंडीज ः 50 षटकांत 6 बाद 311 (ख्रिस गेल 7, एविन लुईस 58 -78 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, शाय होप 77 -92 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, हेटमायर 39 -31 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, निकोलस पूरन 58 -43 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, जेसन होल्डर 45 -34 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, दवलत झदरान 9-1-73-2, महम्मद नबी 10-0-56-1, रशिद खान 10-0-52-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan need 312 runs in 50 Overs vs West Indies