अफगाणिस्तानचे आज कसोटी पदार्पण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 June 2018

अफगाणिस्तान संघ उद्या अधिकृतरित्या कसोटी क्रिकेटच्या नकाशावर झळकेल. त्यांचा पहिला कसोटी सामना उद्या भारताविरुद्ध बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरू होईल. आतापर्यंत अफगाणिस्तानचे क्रिकेट झटपट क्रिकेटसाठी मर्यादित राहिले असले, तरी उद्यापासून त्यांच्या पाच दिवसांच्या क्रिकेटमधील संयमाची कसोटी बघितली जाईल. भारतीय संघ निश्‍चितच एक पाऊल पुढे असला, तरी गेल्या काही वर्षांतील अफगाणिस्तानची प्रगती लक्षात घेता क्रिकेट पंडित त्यांना कमी लेखण्याच्या तयारीत नाहीत. 

बंगळूर - अफगाणिस्तान संघ उद्या अधिकृतरित्या कसोटी क्रिकेटच्या नकाशावर झळकेल. त्यांचा पहिला कसोटी सामना उद्या भारताविरुद्ध बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरू होईल. आतापर्यंत अफगाणिस्तानचे क्रिकेट झटपट क्रिकेटसाठी मर्यादित राहिले असले, तरी उद्यापासून त्यांच्या पाच दिवसांच्या क्रिकेटमधील संयमाची कसोटी बघितली जाईल. भारतीय संघ निश्‍चितच एक पाऊल पुढे असला, तरी गेल्या काही वर्षांतील अफगाणिस्तानची प्रगती लक्षात घेता क्रिकेट पंडित त्यांना कमी लेखण्याच्या तयारीत नाहीत. 

भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने देखील हे मान्य केले. सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ""अफगाणिस्तान संघाला कमी लेखण्याचा प्रश्‍नच नाही. अफगाणिस्तान संघातील गुणवत्ता क्रिकेट जगताने बघितली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांनी चांगला ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ कोणतीही दयामाया न दाखवता क्रिकेट खेळणे पसंत करेल. अर्थातच ही आक्रमकता मैदानावरील खेळापुरतीच मर्यादित असेल.'' 

अपेक्षेप्रमाणे चिन्नास्वामी मैदानावरची खेळपट्टी भरपूर पाणी मारून मग रोलींग करून तयार केली जात आहे. भारतीय संघाचे बलस्थान फलंदाजी बरोबर फिरकी गोलंदाजीत आहे. योगायोग म्हणजे अफगाणिस्तान संघदेखील त्यांच्या फिरकी गोलंदाजीवर सर्वाधिक अवलंबून आहे. राशिद खान आणि मुजीब रेहमानच्या गोलंदाजीतील चमक कसोटी सामन्यात अनावश्‍यक मोठी अडचण ठरू नये, या करिता खेळपट्टीवरील माती लवकर मोकळी होणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. 

पहिल्या कसोटी सामन्याचा उत्साह अफगाणिस्तान खेळाडूंच्यात दिसतो आहे. ""कसोटी सामन्यात तग धरायचा असेल तर आम्हांला फलंदाजीत लक्षणीय बदल आणि सुधारणा करावी लागेल. आमच्या फलंदाजांना संयम राखून मोठी खेळी करायचे तंत्र आत्मसात करावे लागेल. भारतीय संघ किती तयारीने मैदानात उतरणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. खास करून पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली तरच खरी लढत आम्ही भारतीय संघाला देऊ शकू हे जाणून आहोत. गेले काही दिवस तीच तयारी सरावादरम्यान आम्ही करत आहोत. चांगल्या खेळाची लय कसोटी सामन्यात घेऊन जाणे आमच्या हाती आहे'', असे अफगाणिस्तानचा कर्णधार स्टॅनिकझाई म्हणाला. 

भारतीय संघात सलामीला मुरली विजय आणि के एल राहुलला पसंती मिळेल आणि इशांत शर्मा - उमेश यादव सोबत आश्विन, जडेजा सोबत कुलदीप यादवही खेळेल असे वाटते. दिनेश कार्तिक बऱ्याच कालावधीनंतर कसोटी सामना खेळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan's Test cricket debut today