कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

कोहलीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याविरुद्ध जवळपास तक्रारीच केल्याचे समजते. कोहलीची आक्रमकता पाहून आता हा वाद सामंजस्याने मिटेल असे वाटत नाही, असेही या सूत्राने सांगितले.

लंडन - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर पुन्हा एकदा कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे यांच्यातील वादाला नव्याने तोंड फुटले आहे. कर्णधार कोहलीला खरंच प्रशिक्षक म्हणून कुंबळे नकोयंत आणि त्याने तसं स्पष्टपणे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सल्लागार समितीला सांगितले आहे. 

येथील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यापूर्वी शनिवारी कर्णधार विराट कोहलीने सल्लागार समितीची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुंबळेविरोधातील आपली भूमिका मांडल्याचे म्हणण्यात आले आहे. कोहलीच्या या भूमिकेनंतर आता सचिन, गांगुली आणि लक्ष्मण या सल्लागार समितीसमोरील प्रशिक्षक निवडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कोहलीने समितीची भेट घेतली तेव्हा बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर हेदेखील उपस्थित होते. कोहलीच्या भूमिकेनंतर आता सल्लागार समिती कुंबळेशी चर्चा करणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहलीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याविरुद्ध जवळपास तक्रारीच केल्याचे समजते. कोहलीची आक्रमकता पाहून आता हा वाद सामंजस्याने मिटेल असे वाटत नाही, असेही या सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे केवळ कोहलीच नाही, तर संघातील अन्य काही खेळाडूदेखील कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे समजते. 

Web Title: After Pakistan loss, fissure in Kohli-Kumble relationship