रूटने काढले 'शंभर'चे खणखणीत नाणे

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मर्दुमकी गाजवून कसोटी क्रमवारीत अव्वल ठरलेल्या भारतीयांची गोलंदाजी फलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रूट व मोईन यांनी पहिल्या दिवशी तरी चिल्लर ठरवली. 93 षटकांच्या खेळात अवघे चारच फलंदाज बाद झाले.

राजकोट - यमजान देशात सर्वत्र शंभराच्या चलनी नोटांचे महत्त्व वाढले असताना इंग्लंडच्या ज्यो रूटने शतकाचे खणखणीत नाणे सादर केले. त्याच्या पावलावर पाऊल टाकणारा मोईन अलीही शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना पुरते निष्प्रभ केले. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर 4 बाद 311 अशी भक्कम सुरवात केली.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मर्दुमकी गाजवून कसोटी क्रमवारीत अव्वल ठरलेल्या भारतीयांची गोलंदाजी फलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रूट व मोईन यांनी पहिल्या दिवशी तरी चिल्लर ठरवली. 93 षटकांच्या खेळात अवघे चारच फलंदाज बाद झाले. उपाहार ते चहापान या सत्रात भारताला एकही यश मिळाले नाही. येथेच भारतीय गोलंदाजीची निष्प्रभता अधोरेखित झाली. त्यातच क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणाही भोवला.
कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीशी रूटची तुलना केली जाते. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच दिवशी इंग्लंडची पाळेमुळे घट्ट रोवली. सहजसुंदर फलंदाजी करत त्याने लीलया तीन अंकी धावसंख्या पार केली. 11 चौकार व एका षटकारासह त्याने 124 धावा केल्या. त्याने मोईनसह चौथ्या विकेटसाठी 3.70 च्या सरासरीने 179 धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ही सरासरी वर्चस्व सिद्ध करणारी असते. नऊ चौकार मारणारा मोईन 99 धावांवर नाबाद राहिला आहे.

कसोटी पदार्पण करणाऱ्या राजकोटची खेळपट्टी पहिले दोन दिवस तरी फलंदाजीस साह्य करणारी आहे. अशा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याची संधी नाणेफेक जिंकल्यामुळे इंग्लंडला मिळाली. सुरवातीलाच इंग्लंडला बॅकफूटवर ठेवण्याची संधी भारताला मिळाली होती; परंतु क्षेत्ररक्षणातील ढिलाईने ही संधी गमावली. महंमद शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर कुकचा झेल गलीमध्ये अजिंक्‍य रहाणेने सोडला. त्यानंतर विराट कोहलीनेही अशीच संधी सोडली. या संधीचा फायदा घेत कुकने कसोटी पदार्पण करणाऱ्या 19 वर्षीय हमीदसह 47 धावांची सलामी दिली. अखेर रवींद्र जडेजाने ही जोडी फोडली.
डीआरएसचा वापर करावा की नाही अशा संभ्रमात असलेल्या कुकने पंचांचा पायचीतचा निर्णय मान्य केला; पण रिप्लेमध्ये त्याच्या पायाला लागलेला चेंडू यष्टींच्या बाहेर जात असल्याचे दिसून आले. ज्यो रूट मैदानावर आला तोपर्यंत इंग्लिश फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज आला होता. हमीद आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत होता; परंतु अश्‍विनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. या वेळी त्याने डीआरएसचा वापर केला; परंतु तो बाद असल्याचेच स्पष्ट झाले. उपाहाराच्या अखेरच्या षटकात अश्‍विनने डकेटला बाद केले. इंग्लंडची 3 बाद 102 अशी अवस्था झाली होती, त्या वेळी भारताचे 75 टक्के वर्चस्व होते. पण, उपाहारानंतरचा खेळ सुरू झाला आणि रूट-मोईन यांनी भारतीय गोलंदाजांचा "खेळ' केला. खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असताना गोलंदाजी करावी लागली, तर हाताशी अतिरिक्त गोलंदाज असावा म्हणून पाच गोलंदाज खेळवणाऱ्या भारताचे पाचही गोलंदाज पुढच्या दोन सत्रांत अपयशी ठरले. लेगस्पिनर अमित मिश्रा तर फुलटॉस चेंडूच अधिक टाकत होता. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची सरासरी 4.20 अशी होती.

भारताकडून सर्वाधिक षटके अर्थातच अश्‍विनने टाकली; पण 31 षटकांत त्याने शतकी धावा दिल्या. यावरून भारतीय गोलंदाजांचे अपयश स्पष्ट झाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता उमेश यादवने रूटला बाद केले. हाच काय तो दिलासा मिळाला.

Web Title: Alastair Cook wins toss and elects to bat in 1st Test vs India