भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविड? 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएलमुळे भारतीय संघाची कोणतीही लढत होणार नाही. या कालावधीत कुंबळे यांना ब्रेक असेल. त्याच सुमारास कुंबळे यांना अंतिम निर्णय कळवण्यास सांगितले. कुंबळे यांना नव्या पदावर काम करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागणार आहे.

मुंबई, बंगळूर - भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या संघाचे मार्गदर्शक असलेल्या अनिल कुंबळे यांना बढती देऊन त्यांना संघाचे संचालक केले जाण्याची शक्‍यता आहे. कुंबळे यांच्या या बढतीमुळे रिक्त झालेल्या प्रशिक्षक पदावर राहुल द्रविड यांची नियुक्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय समितीने नुकतीच बंगळूरला कुंबळे यांच्याबरोबर चर्चा केली. त्या वेळी संघाच्या संचालक पदाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते. रवी शास्त्री यापूर्वी संघाचे संचालक होते; पण आता या पदाची व्याप्ती वाढणार आहे. कुंबळे यांच्याकडे वरिष्ठ संघाबरोबरच भारत अ आणि कुमार संघाच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्याचीही जबाबदारी असेल. त्याचबरोबर कुंबळे यांना महिला संघाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएलमुळे भारतीय संघाची कोणतीही लढत होणार नाही. या कालावधीत कुंबळे यांना ब्रेक असेल. त्याच सुमारास कुंबळे यांना अंतिम निर्णय कळवण्यास सांगितले. कुंबळे यांना नव्या पदावर काम करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागणार आहे. कुंबळे यांनी हे पद स्वीकारल्यास वरिष्ठ संघाच्या मार्गदर्शकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती होईल, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात द्रविड यांच्याबरोबर प्राथमिक चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काळानुसार बदलण्याची गरज असते. त्या कारणास्तवच सध्याच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. त्याचा फायदा भारतीय क्रिकेटलाच होईल. सर्व संघांची अंतिम जबाबदारी एका व्यक्तीवर असेल, तर त्यांच्या धोरणात सुसूत्रता येईल. आम्ही ही योजना तयार केली आहे. नवी करारपद्धती येण्यापूर्वी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल झाला असेल, असे भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Anil Kumble, Rahul Dravid May Get New Roles In The Indian Team