कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा 

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून 
कसोटी - 17 सामने, 12 विजय, 1 पराभव, 4 अनिर्णित 
वन डे - 13 सामने, 8 विजय, 5 पराभव 
टी-20 - 5 सामने, 2 विजय, 2 पराभव, 1 अनिर्णित

नवी दिल्ली - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत अनिल कुंबळे यांनी गेल्या महिनाभर सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला. भारतीय संघ आता विंडीज दौऱ्यावर प्रशिक्षकाशिवायच खेळेल. 

भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी विंडीज दौऱ्यासाठी रवाना झाला; मात्र प्रशिक्षक अनिल कुंबळे हे लंडनलाच राहिले होते. त्यामुळे कोहली-कुंबळे वादात आणखी तेल ओतले गेले. आयसीसीची वार्षिक परिषद सुरू असल्यामुळे क्रिकेट समितीच्या 22 जून रोजी होणाऱ्या बैठकीसाठी कुंबळे लंडनला राहिले, अशी सारवासारव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कुंबळे बैठकीनंतर विंडीजला रवाना होणार का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांनी टाळले होते. क्रिकेटतज्ज्ञ या प्रश्‍नाचे उत्तर शोधत असतानाच कुंबळे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. 

कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा करार चॅंपियन्स स्पर्धेपर्यंतच होता. त्यामुळे चॅंपियन्स स्पर्धेला संघ रवाना होण्यापूर्वीच बीसीसीआयने त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यास सुरवात केली होती. कर्णधार कोहली यानेदेखील यात आघाडी घेतली. चॅंपियन्स स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्याच्या सरावादरम्यान कुंबळे आणि कोहली यांच्यात अभावानेच संवाद होत होता. कुंबळे चर्चेऐवजी स्वतः नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत होते. चॅंपियन्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कोहलीने क्रिकेट सल्लागार समितीची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुंबळे यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट केली होती. त्यामुळेच भारतीय संघ विंडीजला रवाना होत असलेल्या विमानात कुंबळे न दिसल्याने चर्चेला ऊत आला होता. भारतीय संघ 23 जूनपासून विंडीज संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

कुंबळे यांच्या एक वर्षाच्या प्रशिक्षपदाच्या कालावधीत भारतीय संघाने यशाची चव चाखली होती. त्यांच्या कालावधीत 17 कसोटी सामन्यांपैकी 12 सामने भारताने जिंकले, तर केवळ एकच गमावला होता. त्यामुळे त्यांना प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. 

अनिल कुंबळे प्रशिक्षक म्हणून 
कसोटी - 17 सामने, 12 विजय, 1 पराभव, 4 अनिर्णित 
वन डे - 13 सामने, 8 विजय, 5 पराभव 
टी-20 - 5 सामने, 2 विजय, 2 पराभव, 1 अनिर्णित

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद​

Web Title: Anil Kumble steps down as India coach: BCCI should not have played into Virat Kohli's hands