जेव्हा 7 वर्षाचा 'आर्ची' भारतीय खेळाडूंच्या अभिनंदनासाठी मैदानात उतरतो (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले.

मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले.

मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला होता. या सामन्यासाठी 15 जणांच्या संघात 7 वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारदेखिल होता. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानंतर संघासोबत मैदानात उतरून भारतीय क्रिकेटपटूंच्या हातात हात मिळवून अभिनंदन केले. यावेळी भारतीय क्रिकेटपटूंनीही त्याच्याशी चर्चा करत त्याचे विशेष कौतुक केले.
 

आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावदेखिल केला होता.  त्याचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आर्चीला हृदयविकार आहे. ज्यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रियांना समोरे जावे लागले आहे. तो जेव्हा फक्त तीन महिन्याचा होता तेव्हा त्याच्या हृदयामध्ये दोष असल्याचे समोर आले. ज्यामुळे त्याचे अनियमित हृदयाचे ठोके पडत होते. त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी उपचाराची गरज होती. याच कारणामुळे वेळोवेळी त्याच्यावर अनेक शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या, त्याच्या पुढील आयुष्याबद्दल जास्त खात्री देता येऊ शकत नाही. त्यावेळी आर्चीच्या वडिलांनी जेव्हा त्याला विचारले की त्याला काय करायचे आहे, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करायची इच्छा असल्याचे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: archie schiller meet indian players and match officials after test