अर्जु़न तेंडुलकरचा भारतीय संघासह सराव; शास्त्रींकडून टिप्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या सरावावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भाग घेत, भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. यावेळी त्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून टिप्स मिळाल्या.

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या सरावावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भाग घेत, भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी केली. यावेळी त्याला भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून टिप्स मिळाल्या.
 
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ट्वेंटी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत सराव करायला मिळणे हे त्याच्यासाठी खूप फायद्याचे आहे. तसेच त्याला रवी शास्त्रींकडूनही काही मोलाच्या सूचना मिळाल्या. 

जुलैमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील श्रीलंका दौऱ्यासाठी अर्जुनची निवड करण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर डब्ल्यु. व्ही रमन आणि सनथ कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील कॅम्पसाठी तो उपस्थित राहणार आहे. श्रीलंकेमध्ये होणाऱ्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी  अर्जुनची निवड करण्यात आलेली आहे. परंतू पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याची निवड करण्यात आलेली नाही. नुकतेच एप्रिलमध्ये धर्मशाला येथे पार पडलेल्या 19 वर्षांखालील कॅम्पसाठीही त्याची निवड करण्यात आली होती.

अर्जुनची भारतीय संघासह सराव करण्याची ही पहिली वेळ नाही, भारतीय संघ जेव्हा वानखेडेवर सराव करतो तेव्हा अर्जुन संघातील फलंदाजांना गोलंदाजी करतो. तसेच इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावरही त्याने इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला गोलंदाजी केली होती. भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना होण्याआधी अर्जुनने त्यांच्यासोबतही गोलंदाजीचा सराव केला आहे.

Web Title: Arjun Tendulkar gets tips from Ravi Shastri