'माही'चे ग्लोव्ह्ज कुणाच्या हातात?

गौरव दिवेकर
गुरुवार, 5 जानेवारी 2017

गेल्या महिन्यातली गोष्ट. खच्चून भरलेल्या मैदानावर एकाच वेळी किमान 8-10 मॅचेस सुरू होत्या. सकाळी लवकर येऊन बऱ्यापैकी मध्यभागातलं पिच 'पकडलेल्यां'चा सामना भलताच इंटरेस्टिंग होता. तो सामना इंटरेस्टिंग झाला होता त्यातल्या विकेटकीपरमुळे! म्हणजे, 'लय भारी' कीपर होता, अशातला भाग नाही; पण गोलंदाजानं कुठेही चेंडू टाकला आणि फलंदाज फटका मारण्याच्या तयारीत असताना हा विकेटकीपर त्याचा उजवा पाय हवेत उडवायचा. अगदी चेंडू लेग-साईडला असला तरीही याचा उजवाच पाय हवेत जाणार.. बरं.. एवढं करून फलंदाजाकडून हुकलेला चेंडू पकडण्यातही तो कामरान अकमलचा भाऊच होता..!

गेल्या महिन्यातली गोष्ट. खच्चून भरलेल्या मैदानावर एकाच वेळी किमान 8-10 मॅचेस सुरू होत्या. सकाळी लवकर येऊन बऱ्यापैकी मध्यभागातलं पिच 'पकडलेल्यां'चा सामना भलताच इंटरेस्टिंग होता. तो सामना इंटरेस्टिंग झाला होता त्यातल्या विकेटकीपरमुळे! म्हणजे, 'लय भारी' कीपर होता, अशातला भाग नाही; पण गोलंदाजानं कुठेही चेंडू टाकला आणि फलंदाज फटका मारण्याच्या तयारीत असताना हा विकेटकीपर त्याचा उजवा पाय हवेत उडवायचा. अगदी चेंडू लेग-साईडला असला तरीही याचा उजवाच पाय हवेत जाणार.. बरं.. एवढं करून फलंदाजाकडून हुकलेला चेंडू पकडण्यातही तो कामरान अकमलचा भाऊच होता..! किमान सहाव्या-सातव्यांदा चेंडू सुटल्यानंतर टीममधलाच एक जण भडकला.. 'अय.. तंगड्या कशाला वर कर्तो रे? ब्वॉल पकड न्ना..! च्यायला.. हातात्ला ब्वॉल सोडतंय आणि तंगडं वर करून धोनीची श्‍टाईल मारतंय..' 

.............................................................................................

फलंदाज 'लेट-कट' करत असेल, तर पाय आडवा घालून चेंडू अडवण्याचा एक प्रयत्न ही खास महेंद्रसिंह धोनीची स्टाईल! कॉपी-बुक प्रशिक्षणात असलं काहीही शिकायला मिळणार नाही. ज्याची 'श्‍टाईल' फॉलो करावी, असा यष्टिरक्षक भारतीय संघात गेली अनेक वर्षं नव्हता. 1990 च्या आसपास जन्माला आलेल्या पिढीसाठी 'भारताचा विकेटकीपर' म्हणजे स्मरणशक्‍तीचा खेळच असायचा. एक नयन मोंगिया सोडला, तर या काळात आपण ढिगानं यष्टिरक्षक बदलले. त्यातही, मोंगिया त्याच्या कौशल्यापेक्षा स्टंपच्या मागून 'आई ग्गं..' ओरडण्यासाठीच जास्त लक्षात राहिला. भारतीय संघात प्रकाशझोतात कायम फलंदाज किंवा गोलंदाजच असत. क्षेत्ररक्षण म्हणजे 'सामना सुरू आहे आणि तुम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी करत नाही, म्हणून उभा आहे' अशा स्थितीतलं होतं. महंमद अजहरुद्दीन, अजय जडेजा, रॉबिनसिंग आणि काही प्रमाणात सचिन तेंडुलकर यांचा अपवाद वगळला, तर क्षेत्ररक्षणातही सगळेच हिरे होते. मग विकेटकीपरची काय गत! सामना निकालनिश्‍चितीच्या प्रकरणात मोंगिया अडकला आणि भारताचा नियमित यष्टिरक्षकासाठीचा शोध सुरू झाला. 2000 मध्ये मोंगिया बाहेर गेला आणि त्यानंतरच्या चार वर्षांत भारतीय संघाने आठ यष्टिरक्षक बदलून पाहिले. नावं आठवतायत का पाहा..! मनव्वा प्रसाद, राहुल द्रविड, समीर दिघे, विजय दाहिया, दीप दासगुप्ता, अजय रात्रा, पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक...! यापैकी लक्षात राहणारी नावं तीन-द्रविड, पार्थिव आणि कार्तिक! त्यापैकी द्रविड म्हणजे संघाची गरज म्हणून यष्टिरक्षक झालेला.. पार्थिव पटेल वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर आला.. त्याच्या कामगिरीतही फारसं काही उल्लेखनीय नव्हतं, म्हणून आला कार्तिक! संघाची गरज म्हणून यष्टिंच्या मागे उभा राहिलेल्या द्रविडचा भार हलका करेल, अशी कामगिरी त्यानंही केली नाही. मग आला महेंद्रसिंह धोनी..! 

धोनीची फलंदाजी आणि त्याच्या नेतृत्वगुणांचे जितके कौतुक झाले, त्यापेक्षा काहीसे कमीच त्याच्या यष्टिरक्षणाचं झालं. रुढार्थानं 'प्रमाण' असलेल्या अनेक गोष्टी धोनीनं यष्टिरक्षणातही मोडीत काढल्या. मग वेगवान खेळपट्टीवर रवींद्र जडेजासारख्या फिरकी गोलंदाजासाठी यष्टींपासून चार पावलं मागे उभे राहणं असो वा वर उल्लेख केल्याप्रमाणे फलंदाज 'लेट-कट' करत असताना पाय आडवा घालून चेंडू अडवण्याचा प्रयत्न असो.. फिरकी गोलंदाजीच्या वेळी हात यष्टींच्या अगदी जवळ ठेवत क्षणार्धात 'स्टंपिंग' करणं असो वा फलंदाज चोरटी धाव घेत असताना थ्रो आला, तर चेंडू हातात घेऊन यष्टींना लावण्याऐवजी चेंडूला फक्त दिशा देऊन यष्टींवर ढकलण्याची पद्धत असो.. धोनीनं इतर यष्टिरक्षकांपेक्षा वेगळी; पण प्रचंड परिणामकारक पद्धत वापरली. 

धोनी अद्याप पूर्णपणे निवृत्त झालेला नाही. अजूनही एक-दोन वर्षं तो एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 खेळेल. त्यानंतर मात्र 'धोनीनंतर कोण' हा प्रश्‍न आणखी जोरानं सतावू लागेल. कसोटीमधल्या धोनीच्या निवृत्तीनंतर यष्टिरक्षणाची जबाबदारी वृद्धिमान साहाकडे सोपविण्यात आली. पण बिचाऱ्यावर सतत धोनीशी तुलना होण्याचा प्रसंग आणखी काही काळ तरी ओढवणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच याचा प्रत्यय आला होता. सुरेश रैनानं फलंदाजांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचं काम अचूक केलं...स्लीपमधल्या विराट कोहलीनं जोरात थ्रोही केला; पण साहाला ती संधी साधणं जमलं नाही.. धोनीशी तुलना झाली..! परवा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आश्‍विनचा एक उसळलेला चेंडू व्यवस्थित पकडून साहाने बेल्स उडवल्या; पण तोपर्यंत फलंदाज पुन्हा क्रीझमध्ये आला होता.. पुन्हा धोनीशी तुलना झाली..! 

या पार्श्‍वभूमीवर 'धोनीनंतर कोण' या प्रश्‍नाचं सध्या दिसत असलेल्या पर्यायांमधून शोधण्याचा हा छोटा प्रयत्न..! 

ऋषभ पंत : वय 19 
सध्याच्या तरुण पिढीतला सर्वाधिक गुणवान यष्टिरक्षक आणि प्रचंड आक्रमक फलंदाज म्हणजे ऋषभ पंत. सध्या तो फक्त 19 वर्षांचा आहे; पण आतापासूनच त्याच्याकडे 'धोनीचा वारसदार' म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. कदाचित आधीची परिस्थिती असती, तर ऋषभ पंतचे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेही असते; पण तसं आत्ता लगेच होणार नाही. याचे कारण आहे राहुल द्रविड! नव्या क्रिकेटपटूंना घडवण्याची जबाबदारी द्रविड यांच्याकडे आहे. 'खेळाडू चमकला म्हणून लगेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवा' अशी द्रविड यांची कार्यशैली नाही. प्रत्येक खेळाडूला घासून-पुसून तयार करणं आणि कुठल्याही दडपणाला सामोरं जाण्यासाठी मानसिकदृष्ट्याही कणखर बनवणं, हे त्यांचे काम आहे. त्यानुसार ऋषभ पंतला सध्या तयार केले जात आहे. योग्य वेळी त्याचेही आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण होईल आणि यथावकाश तो भारतीय संघाचा नियमित यष्टिरक्षक होईल, हे नक्की! पण तोपर्यंत धीर धरणे आवश्‍यकच आहे. 

के. एल. राहुल : वय 24 
सध्याच्या भारतीय संघात स्थान असलेला आणि झटपट क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाचा अनुभव असलेला राहुल हाही एक पर्याय असू शकतो. त्याची धडाकेबाज फलंदाजी आणि ठीकठाक यष्टिरक्षण या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. पण सध्या तरी त्याला तंदुरुस्तीचाच प्रश्‍न सतावत आहे. शिवाय, तो पूर्णवेळ यष्टिरक्षक नाही. 'आयपीएल'मध्ये नियमित यष्टिरक्षण करत असला, तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमित यष्टिरक्षक होण्यासाठी त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्या तरी त्याचं प्राधान्य तंदुरुस्त राहून संघातलं स्थान टिकवणं, यालाच आहे. 

ईशान किशन : वय 18 
धोनीच्याच झारखंडमधला हा तरुण खेळाडू. फलंदाजीमध्ये त्याने अद्याप फारशी चमक दाखवलेली नसली, तरीही तोही सध्या राहुल द्रविड यांच्या तालमीत तयार होत आहे. प्रथमश्रेणीच्या 20 सामन्यांत चार शतकं आणि सात अर्धशतकं ही त्याची कामगिरी आहे. यष्टिरक्षणाचं कौशल्य आणि आक्रमक फलंदाजी यामुळे भविष्यात तोही भारतीय संघाच्या नियमित यष्टिरक्षकाच्या जागेच्या स्पर्धेत येऊ शकतो. 

वृद्धिमान साहा : वय 32 
धोनीनंतर कसोटीतील यष्टिरक्षणाची जबाबदारी साहाकडे आली. 'धोनीनंतरचा देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक' असे त्याचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये कौतुक होत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने अद्याप फार चमकदार कामगिरी केलेली नाही. पण त्याची कामगिरी फार वाईटही नाही. धोनीशी सतत तुलना होण्याचा सर्वाधिक फटका साहालाच बसला आहे आणि झटपट क्रिकेटमध्येही त्याचीच निवड झाली, तर या तुलनेला आणखी धार चढेल. 

पार्थिव पटेल : वय 31 
आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करणारा पार्थिव आणि आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केलेला पार्थिव यांच्यात अर्थातच भरपूर फरक पडलेला आहे. यष्टिरक्षणात फार उल्लेखनीय कामगिरी केली नसली, तरीही फलंदाजीत चिकाटी दाखवली आहे. 'आयपीएल'मधील अनुभवामुळे त्याला कदाचित झटपट क्रिकेटमध्ये संधी मिळण्याची शक्‍यता आहे; पण पुन्हा वय आडवं येऊ शकतं. 

नमन ओझा : वय 33 
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेला आणखी एक यष्टिरक्षक! पण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला फार संधी मिळाली नाही. भविष्यातली संघबांधणी लक्षात घेता 33 वर्षीय ओझाला संधी मिळेल की नाही, शंकाच आहे.. 

दिनेश कार्तिक : वय 31 
यष्टिरक्षक म्हणून खरोखरीच गुणवान असलेला हा खेळाडू फलंदाजीतील अपयशामुळे 'बॅकफूट'वर जातो. केवळ यष्टिरक्षक म्हणूनच नाही, तर क्षेत्ररक्षक म्हणूनही तो चपळ आहे. फिरकी गोलंदाजीवर व्यवस्थित यष्टिरक्षण करणाऱ्या मोजक्‍या खेळाडूंमध्ये याचा समावेश आहे. भारतीय संघात दाखल होण्यासाठी सध्या त्याला साहा-पार्थिव पटेल यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. 

याशिवाय स्मित पटेल (वय 23), संजू सॅमसन (वय 21), केदार जाधव (वय 31), रॉबिन उथप्पा (वय 30) हे खेळाडूही यष्टिरक्षण करू शकतात. त्यापैकी केदार जाधव आणि रॉबिन उथप्पा हे 'मेक-शिफ्ट' यष्टिरक्षक आहेत आणि सध्या त्यांचे भारतीय संघातील स्थानच निश्‍चित नाही. त्यामुळे रांगेतल्या इतरांपेक्षा वरचढ कामगिरी करत संघात नियमित यष्टिरक्षक म्हणून दाखल होणं सध्यातरी त्यांच्यासाठी अवघडच आहे. 

क्रिकेट कुणासाठीच थांबलं नाही. डॉन ब्रॅडमन निवृत्त झाले, सुनील गावसकर निवृत्त झाले, सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड-सौरभ गांगुली-व्हीव्हीएस लक्ष्मणही निवृत्त झाले.. क्रिकेट सुरुच राहिलं.. तसंच धोनी निवृत्त झाल्यानंतरही होणारच! पण त्याच्या जागी भारतीय संघात कुणीही आलं आणि त्यानं कितीही दर्जेदार कामगिरी केली, तरीही एखादं स्टंपिंग तरी चुकणार.. एकदा तरी धावबाद करण्याची संधी तो गमावणार आणि आपण म्हणणार.. 'च्यायला.. धोनी हवा होता इथं..!'

Web Title: Article by Gaurav Divekar on probable successors of Mahendra Singh Dhoni in Indian Cricket