होय! भारतात 'चांगले' वेगवान गोलंदाजही आहेत..! 

गौरव दिवेकर
मंगळवार, 28 मार्च 2017

एक काळ असा होता.. म्हणजे, भारतामध्ये कसोटी असेल, तर वेगवान गोलंदाजाची भूमिका म्हणजे नव्या चेंडूची चकाकी घालवायची आणि शांतपणे थर्ड-मॅन किंवा फाईन-लेगला जाऊन उभं राहायचं.. फिरकी गोलंदाज दिवसभर गोलंदाजी करतायत आणि त्यांना विश्रांती म्हणून पुन्हा एकदा कधीतरी दोन-चार षटकं गोलंदाजी या वेगवान गोलंदाजांना दिली जायची. जवागल श्रीनाथ यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आणि झहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण यांचा उदय झाल्यानंतर या चित्रात थोडासा फरक पडला; पण तरीही भारतामध्ये कसोटी असेल, तर त्यासाठी वेगवान गोलंदाजांना फारसं महत्त्व नसायचंच..

एक काळ असा होता.. म्हणजे, भारतामध्ये कसोटी असेल, तर वेगवान गोलंदाजाची भूमिका म्हणजे नव्या चेंडूची चकाकी घालवायची आणि शांतपणे थर्ड-मॅन किंवा फाईन-लेगला जाऊन उभं राहायचं.. फिरकी गोलंदाज दिवसभर गोलंदाजी करतायत आणि त्यांना विश्रांती म्हणून पुन्हा एकदा कधीतरी दोन-चार षटकं गोलंदाजी या वेगवान गोलंदाजांना दिली जायची. जवागल श्रीनाथ यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आणि झहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण यांचा उदय झाल्यानंतर या चित्रात थोडासा फरक पडला; पण तरीही भारतामध्ये कसोटी असेल, तर त्यासाठी वेगवान गोलंदाजांना फारसं महत्त्व नसायचंच.. उमेश यादव, महंमद शमी आणि ईशांत शर्मा यांनी हे चित्र अखेरीस बदललं आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून भारताचा प्रदीर्घ 'होम सीझन' आता संपला आहे. आजपासून पुढचे दोन-तीन दिवस गेल्या 13 कसोटींमधील जमाखर्च मांडण्यात जातील.. भरपूर आकडे येतील आणि नव्या मोसमासाठीची समीकरणंही मांडली जातील. ढोबळमानानं या मोसमाचे 'स्टार' कोण, या प्रश्‍नाचं उत्तर म्हणजे विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव! कधी नव्हे ते भारतामध्ये झालेल्या कसोटी मालिकांमध्ये वेगवान गोलंदाज 'स्टार' ठरले. गेल्या 30 वर्षांत अशी परिस्थिती अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. 

खऱ्या अर्थानं भारतीय संघातील एखाद्या खेळाडूनं आश्‍चर्याचा धक्का दिला असेल, तर तो म्हणजे उमेश यादवनं! एकतर आपल्याकडे 'वेगवान' गोलंदाज सापडणं अवघड.. त्यात तो तंदुरुस्त असणं दुर्मिळच! श्रीनाथ-वेंकटेश प्रसाद यांची कारकिर्द संपल्यानंतर झहीर खानचा अपवाद वगळता भारताचा एकही वेगवान गोलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत नव्हता. मग लक्ष्मीपती बालाजीपासून मोहित शर्मापर्यंत भरपूर जणांना संधी देऊन पाहिली. यात संधी साधली ती उमेश यादव आणि महंमद शमी यांनी. 

उमेश यादवसारखा गोलंदाज भारतीय संघाला गेल्या कित्येक वर्षांत मिळाला नव्हता. 140 पेक्षा जास्त वेगाने सतत गोलंदाजी करणे आणि सर्वांत मुख्य म्हणजे, क्षेत्ररक्षण करतानाही चपळ असणे ही उमेशची दोन वैशिष्ट्यं! इतका चांगला क्षेत्ररक्षक असलेला वेगवान गोलंदाज भारताकडे नव्हता आणि नाही.. आपले बहुतांश वेगवान गोलंदाज 'स्पेल' झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात थोडे सैलच असायचे. अपवाद होता अजित आगरकरचा. पण त्याचा 'थ्रो' जबरदस्त असायचा; पूर्ण क्षेत्ररक्षण नाही. उमेश यादवचं तसं नाही.

क्षेत्ररक्षण करताना तो 'डाईव्ह' मारतो, चटकन उठतो आणि 'थ्रो'ही बऱ्यापैकी अचूक करतो. हे करताना गोलंदाजीमधला त्याचा स्टॅमिना कमी होत नाही, हे विशेष! इतकी वर्षं आपण ब्रेट ली, डेल स्टेनसारख्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षण करतानाही चपळ असल्याचे पाहिले आहे. आता आपल्याकडेही असा गोलंदाज आहे. कारकिर्दीच्या सुरवातीला उमेश यादव आणि वरुण ऍरॉन यांच्यात संघातील स्थानासाठी स्पर्धा असायची. दोघेही वेगवान.. त्यावेळी दोघांचीही दिशा भरकटायची..! एखाद्या षटकात एक-दोन चांगले चेंडू टाकून फलंदाजावर दडपण आणलं, की लगेच पुढचा चेंडू लेग-साईडला किंवा अगदीच फलंदाजाच्या पुढ्यात टाकून धावांची खैरात दोघेही करायचे.. पण उमेशने वेळीच सावरले आणि स्वत:त बदल घडवून आणला. वरुण ऍरॉनचा वेग जास्त असला, तरीही त्याला अजूनही दिशा-टप्पा यावर नियंत्रण राखता येत नाही. हीच चूक उमेशने टाळली आणि यंदाच्या मोसमातला तो भारताचा 'ऍसेट' ठरला. इतका, की त्याला 13 पैकी 12 कसोटींमध्ये संधी मिळाली आणि यात त्याने 30 गडी बाद केले. तेही आर. आश्‍विन (82 विकेट्‌स) आणि रवींद्र जडेजा (71 विकेट्‌स) हे दोघेही फिरकी गोलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये असताना. 

दुसरा हिरो म्हणजे महंमद शमी! हा गडी सतत दुखापतींनी घेरलेला असतो. तरीही खेळतो, तेव्हा त्याच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहवत नाही. वेगवान गोलंदाजीला फारशी साथ न देणाऱ्या खेळपट्टीवरही शमी जीव तोडून गोलंदाजी करतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला. पण तोपर्यंत त्याने भारतीय वेगवान गोलंदाजीला नवी धार आणली होती. कितीही षटके गोलंदाजी केली, तरीही शमीच्या प्रत्येक चेंडूमागचा त्वेष तसाच कायम असतो. 

'यंदाच्या मोसमात चमकलेले भारतीय वेगवान गोलंदाज' यात ईशांत शर्माचाही उल्लेख करावा लागेल. खरं तर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात रिकी पॉंटिंगला सतावणारा स्पेल टाकणारा ईशांत अलीकडच्या काळात प्रभावहीन झाला होता. ना त्याच्या गोलंदाजीत धार होती ना वेग, ना दिशा! पण गेल्या दोन मालिकांमध्ये ईशांतने त्याच्यात झालेली सुधारणा दाखवून दिली. त्यानेही दिशा-टप्प्यावर नियंत्रण राखले. ईशांत आणि उमेश दोघेही प्रचंड मेहनत करत होते; पण भारताचे 'स्लीप'मधील क्षेत्ररक्षक त्यांच्या मेहनतीवर पाणी टाकत होते. 

एकूणात हा मोसम भारतीय संघासाठी चांगलाच फायद्याचा ठरला.. फलंदाजीतील यशाची कायमच चर्चा होते; पण गोलंदाजीमध्ये नव्याने गवसलेल्या या हिरोंमुळे पुढील काही वर्षे तरी भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थ खांद्यांवर असेल, याची ग्वाहीच या मोसमाने दिली आहे. 

भारतात झालेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज 

खेळाडू सामने विकेट्‌स प्रतिस्पर्धी
उमेश यादव 4 17 ऑस्ट्रेलिया 2016-17
जवागल श्रीनाथ 3 17 दक्षिण आफ्रिका 1996-97
ईशांत शर्मा 4 15 ऑस्ट्रेलिया 2008-09
लक्ष्मीपती बालाजी 3 14 पाकिस्तान 2004-05
Web Title: Article on Indian cricket team's fast bowlers by Gaurav Divekar