तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. 26 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात 15 जणांच्या संघात 7 वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

मेलबर्न- मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. 26 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात 15 जणांच्या संघात 7 वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारदेखिल असणार आहे. आस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आर्ची शिलरच्या वाढदिवसादिवशी शनिवारी (ता. 22) रोजी ही घोषणा केली आहे. यानंतर आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावदेखिल केला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आर्चीला हृदयविकार आहे. ज्यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रियांना समोरे जावे लागले आहे. तो जेव्हा फक्त तीन महिन्याचा होता तेव्हा त्याच्या हृदयाच्या वॉलमध्ये दोष असल्याचे समोर आले. ज्यामुळे त्याचे अनियमित हृदयाचे ठोके पडत होते. त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी उपचाराची गरज होती. याच कारणामुळे वेळोवेळी त्याच्यावर अनेक शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या, त्याच्या पुढील आयुष्याबद्दल जास्त खात्री देता येऊ शकत नाही. त्यावेळी आर्चीच्या वडिलांनी जेव्हा त्याला विचारले की त्याला काय करायचे आहे, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करायची इच्छा असल्याचे सांगितले होते.

आर्ची हा दिग्गज माजी लेग स्पीनर शेन वॉर्नला आदर्श मानतो. काही दिवसांपूर्वी त्याला ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याकडून मेक ए विश या फाउंडेशनच्या मदतीने व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्यावेळी त्याला ऑस्ट्रेलियन संघातील त्याच्या समावेशाबद्दल सांगण्यात आले. त्याच्यासाठी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्या कॉलच्या वेळी त्याचे पालकही त्याच्या बरोबर होते. पण लँगर यांनी त्याला अंतिम 15 मध्ये स्थानाची कोणतीही खात्री दिली नाही. पण तरीही त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश हीच आनंदाची गोष्ट आहे.
 

आर्ची जेव्हा अॅडलेड ओव्हल मैदानावर आला तेव्हा त्याला त्याची ऑस्ट्रेलियाची जर्सी देण्यात आली. तसेच त्याने संघाबरोबर सरावातही भाग घेतला होता. त्याचबरोबर आर्चीने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia add 7-year-old leg-spinner Archie Schiller to their squad for 3rd Test against Virat Kohli and co