ऑस्ट्रेलिया सर्वबाद 451; स्मिथ नाबाद 178

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

स्मिथ याला भक्कम साथ देणारा ग्लेन मॅक्‍सवेल (104 धावा - 185 चेंडू) बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड (37 धावा - 50 चेंडू), स्टीव्ह ओकीफ (25 धावा - 71 चेंडू) या तळातल्या फलंदाजांनी उपयुक्त छोटेखानी योगदान देत ऑस्ट्रेलियाचा डाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली

रांची - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (178 धावा - 361 चेंडू) याच्या नाबाद दीडशतकी खेळीच्या सहाय्याने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने साडेचारशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले.

भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा याने 124 धावांत पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्मिथ याला भक्कम साथ देणारा ग्लेन मॅक्‍सवेल (104 धावा - 185 चेंडू) बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड (37 धावा - 50 चेंडू), स्टीव्ह ओकीफ (25 धावा - 71 चेंडू) या तळातल्या फलंदाजांनी उपयुक्त छोटेखानी योगदान देत ऑस्ट्रेलियाचा डाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जडेजा याने अखेरचा फलंदाज जोश हेझलवूड याला चपळाई दाखवत धावबाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव एकूण 137.3 षटकांत 451 धावांत संपुष्टात आला. 

कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानावर नसल्याचा फटका भारताला बसला. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणेने आक्रमक क्षेत्ररचना लावत ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाने वेगाने धावा केल्या. जडेजाचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांना फारसा प्रभाव टाकता आला नाही.

Web Title: Australia all down for 451