ऑस्ट्रेलिया सर्व बाद 260; भारत 1 बाद 38

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

पेस आणि रिव्हर्स स्विंगचे योग्य मिश्रण करीत उमेश यादवने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने कांगारूंचे चार गडी बाद केले.  

गहुंजे : मिचेल स्टार्कने काल दिवसाच्या अखेरीस एकट्याने खिंड लढवत पहिल्याच दिवशी ऑल आऊट होण्याची कांगारूंवरील नामुष्की टाळली, मात्र आज सकाळी अश्विनने लवकरच त्याचा बळी टिपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्व बाद 260 धावा करता आल्या. 
भारताच्या वतीने मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी फलंदाजीला सुरवात केली. मात्र, सातव्या षटकात मुरली विजय जोश हेझलवूडच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 19 चेंडूंत 10 धावा केल्या. त्यावेळी भारताची अवस्था 6.5 षटकांत 1 बाद 26 अशी झाली.

11.1 षटकांत भारताची धावसंख्या 1 बाद 42 होती. चेतेश्वर पुजारा 5 धावांवर खेळत होता. सलामीच्या फलंदाजांनी 4.4 षटकांत बिनबाद 16 धावा केल्या होत्या. तेव्हा मुरली 9 चेंडूत 3 धावांवर, तर लोकेश राहुल 19 चेंडूंत 13 धावांवर खेळत होता. 

तत्पूर्वी, आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन स्टार्कने मैदानावर टिकून वेगवान खेळी करीत 63 चेंडूंत 61 धावा केल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला चेंडू जडेजा झेलला. पुण्यातील गहुंजे स्टेडियमची धावपट्टी म्हणजे मंगळावरील पृष्ठभागासारखे वाटते, असे मत शेन वॉर्न याने व्यक्त केले. 
भारतातील इतर कोणत्याही धावपट्टीपेक्षा ही धावपट्टी वेगळी असल्याचे रवी शास्त्री म्हणाला.

सलामीवीर रेनशॉने पोटदुखीमुळे ब्रेक घेऊनही अर्धशतक केले, तर स्टार्कने नाबाद अर्धशतकी तडाखा दिल्याने भारताला डोकेदुखी झाली. परिणामी पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्याच दिवशी गुंडाळण्याचे भारताचे प्रयत्न फोल ठरले. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने 9 बाद 256 अशी झुंजार मजल मारली.

स्टार्कला हेझलवूडने जिगरी साथ दिली. स्टार्कने भारताच्या फिरकी त्रिकुटातील प्रत्येकाला षटकार खेचला, तर हेझलवूडने केवळ खाते उघडत 31 चेंडूंचा सामना केला. बरीच चर्चा झालेल्या कोरड्या खेळपट्टीवर तळातील एक फलंदाज आक्रमण करीत होता, तर दुसरा बचाव करीत होता. असे दृश्‍य कांगारूंनाही चकित करणारे ठरले. याचे कारण ऑस्ट्रेलियासमोर नव्या चेंडूपासूनच फिरकीचे आव्हान निर्माण झाले होते. 1 बाद 119 वरून 5 बाद 166 आणि नंतर 9 बाद 205 अशी घसरण झाली होती.

पहिलाच चेंडू नाट्यमय ठरला. इशांतने टाकलेला चेंडू रेनशॉनच्या बॅटची कड घेऊन तिसऱ्या स्लिपमधून सीमापार झाला. तेव्हा दोनच स्लिप होत्या. पहिल्याच षटकादरम्यान ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे इशांतचा पाय जेथे पडत होता तेथील माती त्याच्या बुटाला लागून उडत होती. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले आणि दुसऱ्याच षटकासाठी अश्‍विनकडे विराटने चेंडू टाकला, तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब झाले. रेनशॉने खराब चेंडू सीमापार केला. दुसरीकडे वॉर्नरने जयंत यादवला पहिल्याच षटकात दोन चौकार मारत आक्रमक इरादा स्पष्ट केला होता. यातील पहिला चौकार मिडॉन-मिडविकेटमधून फ्लिकवर मिळाला, तर दुसरा चौकार पॉइंटला कट करून मिळविला.

15व्या षटकात जयंतच्या चेंडूवर वॉर्नर चकला आणि त्याच्या शरीरामागून गेलेला चेंडू यष्टीवर आदळला, पण तोपर्यंत पंचांनी नोबॉलची खूण केली होती. तेव्हा भारतीय पाठीराख्यांच्या छातीत धस्स झाले होते. वॉर्नर तेव्हा 20 धावांवर होता. तोपर्यंत वॉर्नर खराब चेंडूंचा आधीच अंदाज घेत आक्रमक फटके मारत होता. या षटकातील पहिलाच चेंडू त्याने असाच पूल करीत चौकार मिळविला होता. पहिला तास किल्ला लढविलेल्या रेनशॉ-वॉर्नर यांनी अर्धशतकी सलामी दिली. जडेजाला वॉर्नरने चौकार, तर रेनशॉने त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जात षटकारही खेचला होता. भारतीय फिरकीचे अस्त्र बोथट करायचे असेल तर आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव हे सूत्र मानून ही जोडी खेळत होती. पहिले सत्र कांगारूंच्या नावावर जवळपास जमा झाले होते. जडेजाच्या पाच षटकांत 24 धावा गेल्यामुळे विराटने उमेश यादवला प्रथमच पाचारण केले. त्याची सुरवात नोबॉलने झाली, पण दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नरची एकाग्रता ढळली. चेंडूच्या रेषेत न येता त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन त्याचा त्रिफळा उडाला. तिसऱ्या क्रमांकावर येऊन स्मिथ एक चेंडू खेळतो तोच रेनशॉने मैदान सोडले. नंतर यामागे पोटदुखीचे कारण असल्याचे स्पष्ट झाले.

उपाहारास ऑस्ट्रेलियाने 1 बाद 84 अशी चांगली स्थिती गाठली होती. हे सत्र 80 टक्के त्यांच्या खात्यात जमा झाले होते. स्मिथ-शॉन मार्श ही जोडी दुसऱ्या सत्रात वर्चस्व राखण्याची अपेक्षा होती. मुंबईतील सराव सामन्यात त्यांनी शतके काढली होती. या सत्रात मात्र चित्र पालटले. यात भारताच्या अचूक गोलंदाजीशिवाय या जोडीची बचावात्मक फलंदाजीसुद्धा तेवढीच कारणीभूत ठरली. जयंतचा चेंडू स्विप करताना शॉन चकला. अश्‍विनला एकाच षटकात दोन चौकार मारलेल्या हॅंडसकॉम्बला जडेजाने स्विपच्या मोहात पाडून पायचीत केले.

स्मिथविरुद्धची चकमक अश्‍विनने पुढच्याच षटकात जिंकली. स्क्वेअर मिडविकेटला उभे राहणाऱ्या विराटने स्वतः झेल टिपत नेतृत्वकौशल्याची चुणूक प्रदर्शित केली. 1 बाद 119 वरून कांगारूंची 4 बाद 149 अशी स्थिती झाली.
हॅंडसकॉम्ब बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रेनशॉने मात्र प्रतिकार सुरू केला. 36 धावांवरून त्याने खेळी पुढे सुरू केली होती. अश्‍विनला चौकार मारत त्याने अर्धशतक पूर्ण केले. उमेशने नव्या हप्त्यातील पहिल्याच षटकात वेडला पायचीत केले. अश्‍विनने रेनशॉची वाटचाल रोखली.
उमेशने ओकीफ आणि लायनला पाठोपाठ बाद केले. त्याला हॅटट्रिकची संधी होती. ती हुकली तरी डाव फार लांबणार नाही असा अंदाज होता; पण स्टार्क-हेझलवूडने तो चुकविला.

दृष्टिक्षेपात पहिला दिवस

  • भारताविरुद्ध अर्धशतक झळकाविणारा मॅट रेनशॉ (20 वर्षे 322 दिवस) ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा फलंदाज. यापूर्वी रिकी डार्लिंग (22 वर्षे 154 दिवस) 1979 80 मध्ये कानपूर येथे
  • उमेश यादवने कारकिर्दीत पाचव्यांदा डेव्हिड वॉर्नरची विकेट मिळविली. शॉन मार्शलाही पाचव्यांदा बाद केले.
  • वॉर्नर रेनशॉची सात डावात चौथ्यांदा अर्धशतकी भागीदारी
  • दहाव्या विकेटसाठी मिशेल स्टार्क जोश हेझलवूडची नाबाद 51 धावांची भागीदारी
  • दहाव्या विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याची या जोडीची भारताविरुद्ध दुसरी वेळ यापूर्वी 2014 15 मध्ये ब्रिस्बेन तेथे 51 धावांची भागीदारी
  • दहाव्या विकेटसाठी अर्धशतकाहून अधिक धावांची भागीदारी करण्याची ऑस्ट्रेलियाची पाचवी वेळ
Web Title: Australia all out for 260; India v Australia at Pune