स्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित

वृत्तसंस्था
Wednesday, 28 March 2018

या तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली. 

मेलबर्न : दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे.

या तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत वर्चस्व मिळविण्यासाठी चेंडू कुरतडण्याची लबाडी स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांनी केल्यामुळे क्रिकेट विश्‍वात खळबळ उडाली होती. आयसीसीने याप्रकरणी स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. सदरलँड यांनी क्रिकेट विश्‍वाबरोबर ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली होती. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पत आणि विश्‍वासार्हता कमी झाली आहे. याचा परिणाम लहान पिढीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचे आणि डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, या दोघांचा आयपीएलमध्ये सहभाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia Ball tampering row Steve Smith, David Warner banned for 1 year