ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानला व्हाईटवॉश

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना यापूर्वीच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा कसोटी विजय आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग 12 व्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या जलद व फिरकी गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 220 धावांनी पराभव तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

सिडनी मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 465 धावांचे आव्हान दिले. चौथ्या दिवसाअखेर पाकने 1 बाद 55 धावा केल्या होत्या. आज त्यावरून पुढे खेळताना पाकिस्तानचा फलंदाजांची ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भंबेरी उडाली. जोश हेझलवूड व मिशेल स्टार्क या जलदगती गोलंदाजांनंतर स्टिव्ह नॉफ्की व नॅथन लिऑन यांच्या फिरकीपुढे पाक फलंदाज टीकू शकले नाहीत. पाकिस्तानकडून यष्टीरक्षक सर्फराज अहमदने प्रतिकार करत सर्वाधिक 72 धावा केल्या. पाकिस्तानचा दुसरा डाव 244 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला मालिकावीर आणि डेव्हिड वॉर्नरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना यापूर्वीच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा कसोटी विजय आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग 12 व्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, पाकिस्तानचा हा सलग सहावा कसोटी पराभव आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर गेला आहे. आता या दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

Web Title: Australia Crush Pakistan to Sweep Test Series 3-0