ऑस्ट्रेलियाने घेतला फिरकीचा धसका

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

ऑस्ट्रेलिया संघाबरोबर पुन्हा सोबत रहाण्याची मला मिळालेली संधी हे माझे भाग्य समजतो. भारतासारख्या दर्जेदार संघासमोर फिरकीसंदर्भात मी त्यांना मार्गदर्शन करेन. मायदेशात भारताविरुद्ध खेळणे सोपे नाही, पण हे आव्हान म्हणून मी स्वीकारत आहे.
- श्रीधरन श्रीराम

सिडनी - भारतात विराट सेनेचा सामना करण्याची तयारी करण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने फिरकीचा धसका घेतला आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज श्रीराम श्रीधरन व इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसर अशा दोघांची मदत घेणार आहे. श्रीरामची फिरकी सल्लागार; तर पानेसरची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे.

आधी न्यूझीलंड व आता इंग्लंडला चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारतातील फिरकीस साह्य करणाऱ्या खेळपट्ट्या आणि वातावरणाची भीती ऑट्रेलियाला वाटू लागली आहे. फेब्रुवारीत त्यांचा संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास येत आहे; पण त्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे.  

श्रीधरन २००० ते २००४ या कालावधीत आठ एकदिवसीय सामने खेळलेला आहे. गतवर्षी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक व श्रीलंका दौऱ्यासाठी तो ऑस्ट्रेलिया संघासोबत फिरकी मार्गदर्शक होता.

श्रीधरन आमच्यासोबत आता बराच काळ आहे. फिरकीसंदर्भातील तो आमच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. दुबईमध्ये आमच्या १६ वर्षांखालील संघाला तो उपखंडातील खेळपट्ट्या आणि हवामानासंदर्भात मार्गदर्शन करत आहे. तो आमच्या सर्व खेळाडूंना जाणतो. त्याच्या मार्गदर्शनाचा आम्हाला भारत दौऱ्यासाठी निश्‍चितच फायदा होईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी सरव्यवस्थापक पॅट हॉवर्ड यांनी सांगितले. 

एकीकडे काही काळ आपल्यासोबत असलेल्या श्रीधरनचे ऑस्ट्रेलिया संघ मार्गदर्शन घेणार असताना त्यांनी माँटी पानेसरचीही फिरकी सल्लागार म्हणून निवड केली आहे. पानेसरची फिरकी गोलंदाजी २०१२-१३ च्या भारत दौऱ्यात इंग्लंडसाठी निर्णायक ठरली होती. त्या दौऱ्यात अखेरच्या तीन सामन्यांत संधी मिळालेल्या पानेसरने १७ बळी मिळविले होते. पानेसर भारतातील खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करावी, याचेही तो भारतात प्रथमच खेळणाऱ्या फलंदाजांना मागर्दर्शन करणार आहे.

Web Title: Australia has taken a swing affright