स्टेन नसूनही स्नेक थिअरी कांगारूंना डसणार का...

मुकुंद पोतदार
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा दौरा असल्यावर पाहुण्या संघांना एका वेगळ्याच प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागतो. इंग्लंडमध्ये तेथील टॅब्लॉइड दैनिकांसह एकूणच मिडीया पाहुण्या संघाच कणा असलेल्या क्रिकेटपटूच्या पाठीशी हात धुवून लागतात. ऑस्ट्रेलियात हे काम क्रिकेटपटूच अगदी मनापासून करतात. ते प्रतिस्पर्ध्याच्या प्रमुख खेळाडूचे मानसिक खच्चीकरण व्हावे म्हणून शेरेबाजी करतात. त्यास स्लेजिंग असे संबोधले जाते.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या क्रिकेट संघांमध्ये काँटे की टक्कर सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलिया हा चँपीयन संघ, तर आफ्रिकेवर चोकर्सचा शिक्का बसलेला. तीन कसोटींच्या मालिकेच्या अनुषंगाने विचार करताना मात्र ही दोन्ही विशेषणे बाजूला ठेवावी लागतील. पहिला मुद्दा म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल नाही. त्यामुळे आजघडीला ते कसोटी क्रिकेटचे चँपीयन नाहीत. आयसीसीची कसोटी अव्वल क्रमांकाची गदा सध्या भारताकडे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आफ्रिकेने गेल्या दोन मालिकांत ऑस्ट्रेलियाला हरविले आहे. यामुळे कांगारूंविरुद्ध खेळताना ते चोक नव्हे तर चार्ज होतात असे नक्कीच म्हणता येईल.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा दौरा असल्यावर पाहुण्या संघांना एका वेगळ्याच प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागतो. इंग्लंडमध्ये तेथील टॅब्लॉइड दैनिकांसह एकूणच मिडीया पाहुण्या संघाच कणा असलेल्या क्रिकेटपटूच्या पाठीशी हात धुवून लागतात. ऑस्ट्रेलियात हे काम क्रिकेटपटूच अगदी मनापासून करतात. ते प्रतिस्पर्ध्याच्या प्रमुख खेळाडूचे मानसिक खच्चीकरण व्हावे म्हणून शेरेबाजी करतात. त्यास स्लेजिंग असे संबोधले जाते. विशेष म्हणजे मालिका पुढे सरकत जाते तसे पाहुण्या संघाचा जो-जो खेळाडू म्हणून फॉर्मात येईल त्याच्यावर स्लेजिंगचे प्रयोग केले जातात. आणखी एक मुद्दा म्हणजे ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सुद्धा प्रतिस्पर्धी फलंदाज फॉर्मात येताच त्याला शिवीगाळ करू लागतात. (विराट कोहली याचे ताजे उदाहरण आहे...)

या मालिकेपूर्वी मात्र दक्षिण आफ्रिकेचा स्ट्राईक बोलर डेल स्टेन याने कांगारूंना पुरुन उरेल अशी शेरेबाजी केली. त्याने स्नेक थिअरी असा विलक्षण शब्दप्रयोग केला. याचे विश्लेषणही त्याने सुरेख केले. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सापासारखी आहे. सापाचे मुंडके ठेचून काढले की त्याच्यातील जीव संपून जातो, नुसते शेपूट वळवळत राहते. स्टीव स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर हे त्यांचे प्रमुख फलंदाज आहेत. त्यांना गारद केल्यावर कांगारूंचा डाव गुंडाळण्यास फार वेळ लागणार नाही.

स्टेनने मांडलेली ही स्नेक थिअरी चर्चेचा विषय ठरली. ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आतापर्यंत बरेच स्लेजिंग केले आहे. त्यात मोटरमाऊथ असे बिरूद मिळालेला स्टीव वॉ, शेन वॉर्न, ग्लेन मॅक््ग्रा अशा ग्रेट बहाद्दरांचा समावेश आहे. त्यांनी केलेले स्लेजींग प्रसिद्ध आहे, पण आजवर कुणा बहाद्दर कांगारूला अशी थिअरी काही मांडता आली नव्हती. स्टेनने ती जणू काही  शास्त्रशुद्ध पद्धतीनेच मांडली आहे. त्याबद्दल स्लेजिंगचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा प्रोफेसर स्टेन यांची थिअरी लेखी तसेच प्रॅक्टीकलसाठी सुद्धा ठेवली जाईल....

तर आता पुन्हा मालिकेकडे वळूयात. तीन कसोटींच्या मालिकेला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत पारडे इकडून तिकडे झाले आहे. दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केले असले तरी त्यांना स्टेनच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे. कांगारूंच्या दीडशतकी सलामीनंतर स्टेननेच ब्रेकथ्य्रू मिळवून दिला, पण नंतर उजव्या खांद्याचे हाड मोडल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. स्टेन उर्वरीत मालिकेस मुकेल. दुसऱ्या डावात गरज लागली तरच तो फलंदाजीला उतरेल.

स्टेनने मैदान सोडले तेव्हा ऑस्ट्रेलियाची एकच विकेट पडली होती. अशावेळी आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्याच्या स्नेक थिअरीपासून प्रेरणा घेतली. दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज व्हरनॉन फिलँडर, तेजतर्रार कागिसो रबाजा यांच्या जोडीला नवोदीत केशव महाराजची फिरकी असे त्रिकूट चालले. यात फिलँडरचा वेगवान आणि महाराजचा डावखुरा फिरकी असा दुतर्फा परस्परविरोधी मारा कांगारूंची कोंडी ठरणारा ठरला.

महाराजने स्मिथला पायचीत करताना डोके चालविले. स्मिथ हा सुरवातीपासून आक्रमक शॉट मारणारा फलंदाज आहे. हेच हेरून महाराजने त्याला चकविले. कांगारूंचे तब्बल चार फलंदाज भोपळा फोडू शकले नाहीत, तर त्यांचे पहिले पाच फलंदाज 23 धावांत गारद होण्याची नामुष्की जवळपास तीन दशकांनी आली. मायदेशातील हे आकडेवारीचे संदर्भ कांगारूंची त्यांच्या मैदानावरील ताकद अधोरेखित करतात.
स्टेनच्या गैरहजेरीत अशी घसरगुंडी उडणे तर आणखी धक्कादायक ठरते. टी-20ला साजेशी फलंदाजी कसोटीत करणाऱ्या वॉर्नरला मात्र ही घसरण चांगलीच लागली. त्यामुळे कसोटी सुरु असताना आणि संघ नाजूक अवस्थेत असतानाच त्याने परखड भाष्य केले.

आमच्यापैकी काही जणांनी आरशासमोर उभे राहून स्वतःलाच प्रश्न विचारावा की, असे शॉट आपण का खेळलो...

वॉर्नरची ही कॉमेंट त्याच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. क्रिकेटपटू म्हणून वॉर्नरमधील समुळ स्थित्यंतर हा एका वेगळ्या लेखाचा विषय ठरेल. कारकिर्दीच्या प्रारंभी प्रमाणाबाहेर मद्यपान केल्यामुळे संघाबाहेर फेकला गेलेला वॉर्नर उपरती झाल्यानंतर इतका शुद्धीवर आलाय की त्याच्या बॅटीतून चौफेर धुलाई होऊन प्रतिस्पर्धी गोलंदाज जणू काही बेशुद्धच पडतात.

वॉर्नर हा खरा लढवय्या आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना ऑसी असे संबोधले जाते. ऑसी हे नुसते विशेषण नसून ती एक वृत्ती आहे. क्रिकेट खेळण्याची ती प्रवृत्ती आहे. कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणूनच वॉर्नरने संताप व्यक्त केला.

आफ्रिकेचे कमबॅक नक्कीच कौतूक करण्यासारखे आहे, पण आतापर्यंत त्यांच्याकडे केवळ शतकापेक्षा थोडी जास्त आघाडी आहे. त्यांना आणखी बरीच मजल मारावी लागेल. स्टेनच्या अनुपस्थितीत त्यांनी कांगारूंना एका डावात रोखले तरी दुसऱ्यांदा असे करण्याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे फलंदाजांवर मोठी मदार असेल. त्यातच एबी डीव्हीलीयर्स हा त्यांचा हुकमी एक्का नाही. याचा अर्थ स्ट्राईक बोलर जायबंदी होण्यापूर्वीच त्यांचा नियमीत कर्णधार आणि घणाघाती फलंदाज मालिकेला मुकला आहे. अर्थात एबीडीचे नसणे अपेक्षित होते, स्टेनचे नसणे मात्र अनपेक्षित आहे.

यातून आफ्रिकन्स कसे सावरतात, ते स्टेनच्या स्नेक थिअरीपासून किती प्रेरीत होतात आणि पेटून खेळ करतात याची उत्सुकता आहे. पर्थमधील वॅका मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला साथ देत आहे. असे चित्र अलिकडे काही कसोटींच्यावेळी दिसले नव्हते. पहिल्या दोन दिवसांत 22 विकेट पडल्यामुळे निकाल नक्की लागणार आहे. तो कुणाच्या बाजूने असेल हे तिसऱ्या दिवसाच्या खेळावर अवलंबून राहील.

Web Title: Australia verses South Africa First Test at the WACA