भारताचीच महाघसरगुंडी

मुकुंद पोतदार - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

गहुंजे - परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर  शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या.

गहुंजे - परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर  शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी १५ विकेट पडल्या.

पहिल्या दिवशी फलंदाजीत प्रतिआक्रमण रचलेल्या कांगारूंनी गोलंदाजीत त्याहून मोठा धक्का दिला तो चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. ओकीफने सहा विकेट घेत वर्मी घाव घातला. भारताला १०५ धावांत गुंडाळून १५५ धावांची भरघोस आघाडी मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने ४ बाद १४३ अशी वाटचाल केली. ऑस्ट्रेलिया एकूण २९८ धावांनी पुढे आहे. त्यांच्या सहा विकेट बाकी आहेत. स्मिथ ५९ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या डावात अश्‍विनने वॉर्नरला पहिल्याच षटकात बाद केले, तेव्हा भारताला प्रतिआक्रमणाची जोरदार संधी होती, अश्‍विनने नंतर शॉनलाही शून्यावर पायचीत केले होते; पण त्यानंतर क्षेत्ररक्षणातील ढिलाई भोवली. 

स्मिथला तीन जीवदाने
स्मिथवर भारतीयांनी तीन जीवदानांची मेहेरनजर केली. २३ धावांवर अश्‍विनच्या चेंडूवर लेग-स्लीपमध्ये विजयने झेल सोडला. मग राहुलऐवजी बदली क्षेत्ररक्षक अभिनव मुकुंदने स्मिथला वैयक्तिक २९ आणि ३७ धावांवर अनुक्रमे जडेजा, अश्‍विनच्या गोलंदाजीवर जीवदान दिले.

खराब सुरवात
तत्पूर्वी, पहिल्याच षटकात अश्विनला चौकार मारून स्टार्क स्वीपच्या प्रयत्नात बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव आणखी लांबू न देता त्यांना २६० धावांत रोखून भारताने दिवसाची सुरवात चांगली केली होती. स्टार्कच्या दुहेरी धक्‍क्‍यानंतर ओकीफचा तिहेरी धक्का बसला. स्टार्कने एका चेंडूंच्या अंतराने चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांना बाद केले. कोहली बाद झाल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना स्फूरण चढले. ३ बाद ९४ वरून भारताने ३८ मिनिटांत ४८ चेंडूंमध्ये ११ धावांत सात विकेट गमावल्या. 

ओकीफचा तिहेरी हादरा
राहुल-रहाणे जोडीवर भारताची भिस्त असताना ओकीफला बाजू बदलून गोलंदाजीला आणण्याची स्मिथची चाल प्रभावी ठरली. त्याने प्रथम जम बसलेल्या राहुलचा अडथळा दूर केला.  राहुल उतावीळपणामुळे टायमिंगची जोड देऊ शकला नाही. चौथ्या चेंडूवर रहाणे चकला आणि हॅंडसकॉम्बने उजवीकडे झेपावत झेल घेतला. सहाव्या चेंडूवर साहाला चाचपडत खेळण्याची चूक त्याला भोवली. लियॉनने पुढील षटकात अश्‍विनचा अडथळा दूर केला. ओकीफने उरलेल्या तिन्ही विकेट टिपल्या. यात अष्टपैलू क्षमतेच्या जडेजाचा स्वैर फटका धक्कादायक ठरला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - (९ बाद २५६ वरून) स्टार्क झे. जडेजा गो. अश्‍विन ६१, हेझलवूड नाबाद १, अवांतर १५, एकूण ९४.५ षटकांत सर्वबाद २६० 

गोलंदाजी - ईशांत ११-०-२७-०, आश्‍विन ३४.५-१०-६३-३, जयंत १३-१-५८-१, जडेजा २४-४-७४-२, उमेश १२-३-३२-४

भारत - पहिला डाव - विजय झे. वेड गो. हेझलवूड १०, राहुल झे. वॉर्नर गो. ओकीफ ६४, पुजारा झे. वेड गो. स्टार्क ६, विराट झे. हॅंडसकॉम्ब गो. स्टार्क ०, रहाणे झे. हॅंडसकॉम्ब गो. ओकीफ १३, अश्विन झे. हॅंडकॉम्ब गो. लायन १, साहा झे. स्मिथ गो. ओकीफ ०, जडेजा झे. स्टार्क गो. ओकीफ २, जयंत यष्टिचीत वेड गो. ओकीफ २, उमेश झे. स्मिथ गो. ओकीफ ४, ईशांत नाबाद २, अवांतर १, एकूण ४०.१ षटकांत सर्वबाद १०५

बाद क्रम - १-२६, २-४४, ३-४४, ४-९४, ५-९५, ६-९५, ७-९५, ८-९८, ९-१०१

गोलंदाजी - स्टार्क ९-२-३८-२, ओकीफ १३.१-२-३५-६, हेझलवूड ७-३-११-१, लियॉन ११-२-२१-१

ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव - वॉर्नर पायचीत गो. आश्‍विन १०, शॉन पायचीत गो. आश्‍विन ०, स्मिथ खेळत आहे ५९, हॅंडसकॉम्ब झे. विजय गो. आश्‍विन १९, रेनशॉ झे. ईशांत गो. जयंत ३१, मिशेल मार्श खेळत आहे २१, अवांतर ३, एकूण ४६ षटकांत ४ बाद १४३ 
बाद क्रम - १-१०, २-२३, ३-६१, ४-११३

गोलंदाजी - आश्‍विन १६-३-६८-३, रवींद्र जडेजा १७-६-२६-०, उमेश यादव ५-०-१३-०, जयंत यादव ५-०-२७-१, ईशांत शर्मा ३-०-६-०.

Web Title: australia vs india test match