विराट, ऑस्ट्रेलियन माध्यमांकडे तू दुर्लक्षच कर : मायकेल क्‍लार्क

पीटीआय
बुधवार, 22 मार्च 2017

स्टीव्ह स्मिथही दुर्लक्षच करतो 
कोहलीची बाजू घेताना क्‍लार्कने ऑस्ट्रेलियन माध्यमांवर कडक शब्दांत टीका केली. 'कोहलीचे राहू द्या, स्टीव्ह स्मिथही ऑस्ट्रेलियन माध्यमांना फारसे गांभीर्याने घेत नाही. किंबहुना, 'धरमशालातील कसोटीवरच लक्ष केंद्रीत करा' असेच दोन्ही संघांचे कर्णधार आपापल्या खेळाडूंना सांगत असतील,' अशी प्रतिक्रिया क्‍लार्कने व्यक्त केली. 

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष सुरू असतानाच ऑस्ट्रेलियन माध्यमांनीही यात उडी घेतली आहे. 'भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणजे क्रीडा विश्‍वातील डोनाल्ड ट्रम्पच आहे' अशी टीका ऑस्ट्रेलियाच्या 'डेली टेलिग्राफ'ने केल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने मायदेशातील माध्यमांना कानपिचक्‍या दिल्या आहेत. 

'ऑस्ट्रेलियाचे दोन-चार पत्रकार विराट कोहलीची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहेत. पण कोहलीने त्यांच्या या प्रयत्नांकडे अजिबात लक्ष देऊ नये,' अशी प्रतिक्रिया क्‍लार्कने व्यक्त केली. 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच कोहलीही प्रत्येक गोष्टीचे खापर माध्यमांवर फोडत आहे,' अशी टीका 'डेली टेलिग्राफ'ने केली होती. 

यावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही 'डेली टेलिग्राफ'ची खिल्ली उडविली आहे.

T 2471 - Aussi media calls Virat, Donald Trump of sports !! ... thank you Aussi media for accepting that he is a winner and the PRESIDENT !! pic.twitter.com/ZOoNtuhtC2

— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 21, 2017

क्‍लार्कनेही कोहलीलाच पाठिंबा दिला. 'कोहलीची तुलना ट्रम्प यांच्याशी करणे म्हणजे मूर्खपणाची हद्द आहे. कोहलीने जे केले, तेच स्टीव्ह स्मिथनेही केले असते. माध्यमांचे सोडून द्या; एक लक्षात ठेवा, मला विराट कोहली आवडतो.. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनाही तो आवडतो. कोहली ज्या पद्धतीने खेळतो आणि आव्हाने स्वीकारण्याची त्याची तयारी असते, ते पाहता मला कायम त्याच्यात ऑस्ट्रेलियन झुंजारपणा दिसतो. काही पत्रकार कोहलीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण त्याकडे कोहलीने दुर्लक्षच करावे,' असे क्‍लार्क म्हणाला. 

विराट कोहली मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि अव्वल स्थानी असताना असेच कणखर असायला हवे. चॅम्पियन्स असेच खेळतात. आतापर्यंतच्या मालिकेत कोहली अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकलेला नाही; पण पुढच्या सामन्यात शतकी खेळी करून तो भारताला मालिकाही जिंकून देऊ शकतो. क्रिकेट रसिकांच्या कोहलीकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे प्रचंड आहे. प्रत्येकवेळी तो मैदानात उतरला, की प्रेक्षकांना त्याच्याकडून शतकी खेळीची अपेक्षा असते. 
- मायकेल क्‍लार्क, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 

Web Title: Australian reporters trying to tarnish Virat Kohli's image, says Michael Clarke