भारताचा दमदार प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

स्मिथ-मॅक्‍सवेलच्या भागीदारीने ऑस्ट्रेलिया 451

स्मिथ-मॅक्‍सवेलच्या भागीदारीने ऑस्ट्रेलिया 451
रांची - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद 178) आणि ग्लेन मॅक्‍सवेल (104) यांच्या 191 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध 451 धावांची मजल मारली. खेळपट्टीकडून अजूनही फलंदाजांचेच लाड पुरवले जात असताना भारतानेदेखील दुसऱ्या दिवसअखेरीस शुक्रवारी 1 बाद 120 असा दमदार प्रारंभ केला. खेळ थांबला तेव्हा मुरली विजय 42, तर चेतेश्‍वर पुजारा 10 धावांवर खेळत होता.

रवींद्र जडेजाचे पाच बळी हेदेखील दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

भारतीय कर्णधार विराट कोहली याची खांद्याची दुखापत गंभीर नसली, तरी आज तो क्षेत्ररक्षणाला उतरला नाही. स्मिथ आणि मॅक्‍सवेल या दोन्ही नाबाद फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना भंडावून सोडले. एरवी आक्रमक खेळणाऱ्या मॅक्‍सवेलने संयम दाखवत कारकिर्दीमधील पहिले शतक साजरे केले. क्रिकेटच्या तीनही प्रकारांत शतक ठोकण्याची अनोखी कामगिरी केल्यानंतर मॅक्‍सवेल लगेच बाद झाला. जमलेली जोडी फुटल्यावरही भारतीय गोलंदाज त्याचा फायदा उठवू शकले नाहीत. एकही गोलंदाज स्मिथला चकवू शकला नाही. फलंदाजीचे विचित्र तंत्र असूनही स्मिथ चेंडू बॅटच्या मधोमध घेत फटकावत होता.

मॅक्‍सवेल बाद झाल्यावर त्याला मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह ओकीफ यांनी मोलाची साथ केली. या दोघांबरोबर स्मिथने अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फुगवली. स्मिथने ज्या पद्धतीने टिच्चून फलंदाजी केली, तशीच भारताच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने नेटाने मारा केला. त्यानेच आजचे पहिले यश मिळवताना मॅक्‍सवेलला बाद केले. स्मिथ-वेड ही जमलेली जोडीही त्याने वेडला बाद करून फोडली. त्याच षटकात एका चेंडूच्या अंतराने त्याने कमिन्सचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ओकीफने स्मिथला साथ केली. मैदानातील मोकळ्या जागा शोधत स्मिथने एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. स्मिथची द्विशतकाकडे सुरू असलेली वाटचाल समोरून साथीदार बाद झाल्याने अर्धवट राहिली. उमेश यादवने बाउन्सरवर ओकीफला बाद केले. त्यानंतर जडेजाने लायनची शिकार केली आणि हेझलवूडला धावबाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला. स्मिथ 178 धावांवर नाबाद राहिला. जडेजाने पाच गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करताना भारताला मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी भक्कम सलामी दिली. विजयची सावध आणि राहुलची आक्रमक भूमिका यामुळे भारताच्या धावा सहज वाढू लागल्या. स्मिथने चाळीस षटकांच्या खेळात आपल्याकडील चारही प्रमुख गोलंदाज वापरून बघितले. पण, राहुल-विजयने दाद दिली नाही. राहुलने चौथे अर्धशतक पूर्ण केले. सातत्याने आखूड टप्प्याचा मारा करणाऱ्या पॅट कमिन्सला अखेर यश मिळाले. उजव्या यष्टीवर उसळलेला कमिन्सचा चेंडू सोडण्याऐवजी खेळण्याची चूक राहुलने केली आणि वेडने त्याचा झेल घेतला. राहुल-विजयने 91 धावांची सलामी दिली. त्यानंतर विजय-पुजारा यांनी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

दिवस दुसरा
- भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक खेळी करणारा स्टिव्ह स्मिथ (नाबाद 178) तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज. यापूर्वी डीन जोन्स (210), मॅथ्यू हेडन (203)
- भारतात दीडशेहून अधिक धावा करणारा पाचवा परदेशी कर्णधार. यापूर्वी क्‍लाईव्ह लॉईड (वेस्ट इंडीज), ऍलिस्टर कूक (इंग्लंड), आल्विन कालिचरण (वेस्ट इंडीज) आणि इंझमाम उल हक (पाकिस्तान) यांची अशी कामगिरी
- कर्णधार म्हणून लॉईडची तीन वेळा दीडशेहून अधिक धावांची खेळी. कूकच्या दोन वेळा
- भारतात सर्वोच्च खेळी करणारा स्मिथ पहिला ऑस्ट्रेलियन कर्णधार. यापूर्वी मायकेल क्‍लार्क 130 (चेन्नई, 2012-13)
- स्मिथकडून सर्वाधिक 361 चेंडूंचा सामना करण्याची दुसरी वेळ. यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध 361 चेंडूंतच स्मिथच्या 199 धावा
- स्मिथची कारकिर्दीमधील चौथी सर्वोच्च धावसंख्या. एकूण 19 शतकांतील सहावी दीडशतकी खेळी. भारताविरुद्ध तिसरी
- भारतात गेल्या आठ सामन्यांत पहिल्या डावात चारशेहून अधिक धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा बंगळूरमध्ये (2004) एकच विजय. अन्य सात सामन्यांत चार पराभव, दोन ड्रॉ आणि एक टाय
- इंग्लंडविरुद्धच्या यापूर्वी झालेल्या मालिकेतील अखेरच्या दोन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावातील चारशेहून अधिक धावांनंतरही भारताचे दोन्ही सामन्यांत डावाने विजय
- भारताच्या रवींद्र जडेजाची डावात 5 गडी बाद करण्याची आठवी वेळ. अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज. यापूर्वी अशी कामगिरी विनू मांकड यांची. मांकड यांची कामगिरी 44 कसोटींत, तर जडेजाची केवळ 29 कसोटीत. सर्वाधिक 18 वेळा पाच गडी बाद करण्याची कामगिरी बेदी यांची
- क्रिकेटच्या तीनही प्रकारांत शतक करणारा ग्लेन मॅक्‍सवेल दुसरा ऑस्ट्रेलियन. यापूर्वी शेन वॉटसन. सहाव्या कसोटीत मॅक्‍सवेलचे पहिले शतक
- पाचव्या विकेटसाठी भारतात स्मिथ-मॅक्‍सवेलची सर्वोच्च 191 धावांची भागीदारी. भारताविरुद्धची ऑस्ट्रेलियाकडून चौथी भागीदारी
-एकाच मालिकेत चार अर्धशतकी खेळी करणारा राहुल तिसरा भारतीय. यापूर्वी चेतन चौहान (वेस्ट इंडिज विरुद्ध 1988-89, ऑस्ट्रेलिया 1979-80), नवज्योत सिद्धू (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1997-98)
 

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 4 बाद 299 वरून पुढे चालू -
स्टिव्ह स्मिथ नाबाद 178 -361 चेंडू, 17 चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल झे. शाहा गो. जडेजा 104 -185 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार, मॅथ्यू वेड झे. साहा गो. जडेजा 37, पॅट कमिन्स त्रि. गो. जडेजा 0, स्टिव्ह ओकिफ झे. विजय गो. यादव 25, नॅथन लायम झे. नायर गो. जडेजा 1, जोश हेझलवूड धावबाद 0, अवांतर 22, एकूण 137.3 षटकांत सर्वबाद 451

गडी बाद क्रम - 5-331, 6-395, 7-395, 8-446, 9-449
गोलंदाजी - ईशांत शर्मा 20-2-70-0, उमेश यादव 31-3-106-3, आर. आश्‍विन 34-2-114-1, रवींद्र जडेजा 49.3-8-124-5, मुरली विजय 3-0-17-0

भारत पहिला डाव
लोकेश राहुल झे. वेड गो. कमिन्स 67, मुरली विजय खेळत आहे 42, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 10, अवांतर 1 एकूण 40 षटकांत 1 बाद 120

गडी बाद क्रम - 1-91
गोलंदाजी - जोश हेझलवूड 9-2-25-0, पॅट कमिन्स 10-1-22-1, स्टिव्ह ओकिफ 10-3-30-0, नॅथन लायन 11-0-42-0

Web Title: austrolia india test cricket match