स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा स्टार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी कलाटणी देत पाकिस्तानला डावाने गारद केले. मिशेल स्टार्कने अष्टपैलू कामगिरी बजावली. सात षटकारांचा तडाखा दिल्यानंतर चार विकेट टिपत त्याने कांगारूंचा सनसनाटी विजय साकार केला.

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी कलाटणी देत पाकिस्तानला डावाने गारद केले. मिशेल स्टार्कने अष्टपैलू कामगिरी बजावली. सात षटकारांचा तडाखा दिल्यानंतर चार विकेट टिपत त्याने कांगारूंचा सनसनाटी विजय साकार केला.

पाऊस आणि वादळाचा व्यत्यय आलेली ही कसोटी चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकली होती. पाकने ९ बाद ४४३ धावसंख्येवर डाव घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाने ६ बाद ४६५ अशी मजल मारून २२ धावांची आघाडी घेतली होती. शेवटच्या दिवशी स्टार्कने ९१ चेंडूंत ८४ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाने उपाहारापूर्वी ८ बाद ६२४ धावसंख्येवर डाव घोषित केला. त्यांच्याकडे १८१ धावांची आघाडी होती. किमान ७० षटके त्यांच्या हाताशी होती. पाकला डावाचा मानहानिकारक पराभव टाळणे सहज शक्‍य होते, पण त्यांचा डाव ५४व्या षटकांतच आटोपला.

ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनला प्रकाशझोतात पहिल्या कसोटीत ३९ धावांनी विजय मिळविला होता. तिसरी कसोटी तीन जानेवारीपासून सिडनीला सुरू होईल.
सामन्याचा मानकरी कर्णधार स्टीव स्मिथ ठरला. काल तो १०० धावांवर नाबाद होता. आज आणखी ६५ धावा काढून तो नाबाद राहिला. विजयाचे श्रेय मात्र स्टार्क आणि फिरकी गोलंदाज नेथन लायनला द्यावे लागेल.

स्टार्कने मेलबर्नला एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारले. यापूर्वी अँड्य्रू सायमंड्‌सने २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांच्या खेळीत सहा षटकार मारले होते. स्टार्कने पाच षटकार लेगस्पिनर यासीर शहाला मारले. गोलंदाजीत त्याने बाबर आझमनंतर तळाचे तीन फलंदाज टिपले.
लायनने १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर युनूस खान, तर तिसऱ्या चेंडूवर मिस्बाला बाद केले. मिस्बा खातेही उघडू शकला नाही. तेथेच पाकला मोठा हादरा बसला. युनूसचा शॉर्टलेगला हॅंड्‌सकाँबने चपळाईने झेल टिपला, तर मिस्बा स्वीपच्या प्रयत्नात चकला. लायनने फॉर्मातील असद शफीकलाही (१६) टिपले.

संक्षिप्त धावफलक -

पाकिस्तान - पहिला डाव - ९ बाद ४४३ घोषित
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - १४२ षटकांत ८ बाद ६२४ घोषित (डेव्हिड वॉर्नर १४४, उस्मान ख्वाजा ९७, स्टीव स्मिथ नाबाद १६५-४०७ मिनिटे, २४६ चेंडू, १३ चौकार, १ षटकार, पीटर हॅंड्‌सकाँब ५४, मिचेल स्टार्क ८४-९१ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार, आमीर खान ०-९१, सोहेल खान ३-१३१, यासीर शाह ३-२०७, वहाब रियाझ २-१४७)

पाकिस्तान - दुसरा डाव - ५३.२ षटकांत सर्वबाद १६३ (अझर अली ४३, युनूस खान २४, मिस्बा उल हक ०, सर्फराज अहमद ४३, स्टार्क १५.२-४-३६-४, जॉश हेझलवूड २-३९, नेथन लायन १४-४-३३-३)

Web Title: austrolia pakistan test cricket match