अक्षर पटेल आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहांत 

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सांघिक क्रमवारीत भारताच्या पदरी केवळ एक गुण पडला आहे. अर्थात, त्यांचे चौथे आणि न्यूझीलंडचे तिसरे स्थान कायम राहिले. ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह आघाडीवर आहेत. 

नवी दिल्ली : अष्टपैलू म्हणून नावारूपाला येणारा भारताचा अक्षर पटेल आयसीसी एकदिवसीय क्रमवारी पहिल्या दहांत आला आहे. पहिल्या दहांत स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. 

अक्षरने नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत चार गडी बाद केले होते. आयसीसी क्रमवारीत तो नवव्या स्थानावर आला आहे. त्यानंतर लेगस्पिनर अमित मिश्रा पहिल्या विसांत आला आहे. मिश्राने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 15 गडी बाद केले. तो आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या साथीत 12व्या स्थानावर आहे. गोलंदाजी क्रमवारीत सुधारणा करणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांमध्ये उमेश यादव आणि जसप्रित बुमरा यांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध आठ गडी बाद करणारा उमेश 35; तर बुमरा 57व्या स्थानावर आहे. 

गोलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने आघाडीचे स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडीजचा सुनील नारायण दुसऱ्या; तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर तिसऱ्या स्थानावर आहे. 

गोलंदाजांचे मानांकन सुधारले असले, तरी भारतीय फलंदाज यात अपयशी ठरले आहेत. रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना दोनने खाली घसरावे लागले आहे. रोहित नवव्या; तर अजिंक्‍य विसाव्या स्थनावर आले आहेत. मालिकेत विराट कोहलीने 358 धावा केल्या असल्या, तरी तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्स याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ या दोघांमधील गुणांचा फरक कमी झाला आहे. आता दोघांमध्ये केवळ 13 गुणांचा फरक आहे. 

सांघिक क्रमवारीत भारताच्या पदरी केवळ एक गुण पडला आहे. अर्थात, त्यांचे चौथे आणि न्यूझीलंडचे तिसरे स्थान कायम राहिले. ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह आघाडीवर आहेत. 

क्रमवारी : (अनुक्रमे पहिले दहा) 
सांघिक : ऑस्ट्रेलिया (118), दक्षिण आफ्रिका (116), न्यूझीलंड (112), भारत (111), इंग्लंड (107), श्रीलंका (101), बांगलादेश (95), पाकिस्तान (89), वेस्ट इंडीज (88), अफगाणिस्तान (52) 

फलंदाजी :

एबी डिव्हिलर्स (861), विराट कोहली (848), डेव्हिड वॉर्नर (786), क्वींटॉन डी कॉक (779), केन विल्यम्सन (770), हशिम आमला (748), ज्यो रुट (747), मार्टिन गुप्टिल (729), रोहित शर्मा (728), डु प्लेसिस (721) 

गोलंदाजी :

ट्रेंट बोल्ट (735), सुनील नारायण (725), इम्रान ताहिर (712), मिशेल स्टार्क (690), मॅट हेन्‍री (661), शकिब अल हसन (660), आदिल रशिद (655), कागिसो रबाडा (628), अक्षर पटेल (624), मश्रफी मोर्तझा (623) 

Web Title: Axar Patel only Indian bowler in ICC's ODI bowler's list